येरमाळा – येडशी जवळील ‘साई कला केंद्रा’तील नर्तकीच्या सततच्या पैशाच्या मागणीला आणि मानसिक त्रासाला कंटाळून रुई (ढोकी) येथील एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (दि. ०९) दुपारी चोराखळी शिवारात ही घटना घडली. विशेष म्हणजे, आत्महत्येच्या तीन तास अगोदर या तरुणाने सोशल मीडियावर स्वतःच्या मृत्यूबाबत एक सूचक स्टेटस ठेवला होता. याप्रकरणी संबंधित नर्तकीला अटक करण्यात आली आहे.
आश्रुबा अंकुश कांबळे (वय २५, रा. रुई, ता. जि. धाराशिव) असे मयत तरुणाचे नाव आहे. आश्रुबा हा येडशी येथील पेट्रोल पंपावरील स्टोन क्रशरवर कामाला होता. त्याचे आणि साई कला केंद्रातील नर्तकी पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे (रा. हरंगुळ, लातूर) यांचे प्रेमसंबंध जुळले होते. पूजा हिचे आश्रुबाच्या घरी येणे-जाणे होते, ज्यामुळे आश्रुबा आणि त्याची पत्नी साक्षी यांच्यात सतत भांडणे होत होती. या कौटुंबिक कलहामुळे पत्नी साक्षी माहेरी निघून गेली होती.
प्राप्त माहितीनुसार, पूजा सतत फोन करून आश्रुबाला कला केंद्रावर बोलवत असे आणि पैशांची मागणी करत असे. तिच्या मागणीसाठी आश्रुबाने घरातील सोन्या-चांदीचे दागिने मोडून पैसे दिले होते, तरीही तिचा पैशासाठी तगादा सुरूच होता. घटनेच्या आधी तीन दिवसांपासून आश्रुबा पूजासोबत कारने (एमएच २५, ए के २७७७) फिरत होता. ते दोघे शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी देखील गेले होते.
प्रवासात असताना त्यांच्यात पुन्हा पैशावरून जोरदार भांडण झाले. या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आश्रुबाने दि. ०९ डिसेंबर रोजी दुपारी ०१:३० ते ०३:३० च्या सुमारास चोराखळी शिवारातील सोनवणे कॉलेजकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या साधारण तीन तास अगोदर आश्रुबाने आपल्या मोबाईलवर “कधी रडायचं नाही… आ…मी जर कधी अचानक…मेलो तर” असा स्टेटस ठेवला होता.
याप्रकरणी मयताचे चुलते भारत अर्जुन कांबळे (वय ६७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात आरोपी पूजा वाघमारे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये आत्महत्यूस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पूजाला अटक केली आहे.






