धाराशिव: फेसबुकवर बनावट ओळख निर्माण करून एका १९ वर्षीय तरुणाला तब्बल १ लाख २० हजार रुपयांना गंडवल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरात घडली आहे. आरोपीने तरुणाच्या जिजाला (बहिणीचा नवरा) दुबई पोलिसांनी अटक केल्याचे भासवून, त्याला सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली होती. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरेंद्रकुमार सुभाष मंडल (वय १९, सध्या रा. चौरस्ता पाणी टाकीजवळ, धाराशिव, मूळ रा. बिहार) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. विरेंद्रकुमार यांना १७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३:३० ते रात्री ११:०० च्या दरम्यान ‘संजय कुमार’ नावाच्या फेसबुक आयडीवरून संपर्क साधण्यात आला. समोरील व्यक्तीने विरेंद्रकुमार यांच्या जिजाच्या नावाने बोलत असल्याचे भासवले.
आरोपीने विरेंद्रकुमार यांना सांगितले की, त्यांच्या जिजाला दुबई पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांना सोडवण्यासाठी ७ लाख रुपये भरावे लागतील. अन्यथा, त्यांना ७ वर्षांची शिक्षा होईल, अशी भीती घातली. घाबरलेल्या विरेंद्रकुमार यांनी आरोपीच्या सांगण्यावरून त्याच्या मोबाईल क्रमांकावर (९८३३२९७६४५, ८२९१३३६२२७) ऑनलाईन पद्धतीने १ लाख २० हजार रुपये पाठवले.
पैसे पाठवल्यानंतरही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आणि आपल्या जिजाशी संपर्क झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे विरेंद्रकुमार यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ३ जुलै २०२५ रोजी धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
विरेंद्रकुमार मंडल यांच्या फिर्यादीवरून, सायबर पोलिसांनी ‘संजय कुमार’ या फेसबुक आयडी धारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), २०४, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) आणि ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपीचा मोबाईल क्रमांक आणि फेसबुक आयडीच्या आधारे अधिक तपास करत आहेत.