धाराशिव: जिल्हा परिषदेतील प्रशासकीय वर्तुळात मोठी फेरबदल झाली असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह चार प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी शासनाने जारी केले आहेत. त्याचबरोबर तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती धाराशिव जिल्हा परिषदेत करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे रिक्त झालेल्या पदांवर बुधवारपर्यंत नवीन अधिकारी रुजू होण्याची शक्यता आहे.
बदली झालेले अधिकारी आणि त्यांची नवीन नियुक्ती:
- विलास जाधव: अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या विलास जाधव यांची त्याच पदावर बीड येथे बदली करण्यात आली आहे.
- श्याम गोडभरले: पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले यांची लातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर बदली झाली आहे.
- सूर्यकांत भुजबळ: सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात बदली करण्यात आली आहे.
- ए. एस. मिरगणे: रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक ए. एस. मिरगणे यांची औसा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर बदली झाली आहे.
जिल्हा परिषदेत नव्याने नियुक्त झालेले अधिकारी:
- अनुप शेंगुलवार: यांची ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- ए. आर. कुंभार: श्याम गोडभरले यांच्या जागी, ए. आर. कुंभार यांची धाराशिवच्या पंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
- टी. के. भालके: लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी टी. के. भालके यांची सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.