धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळी, कोंड आणि पाडोळी या प्रमुख गटांमध्ये भाजपमध्ये नाराजीनाट्य उफाळून आले असून, पाडोळी गटात ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव पुजारी यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे.
५५ वर्षांच्या निष्ठेला डावलल्याने नाराजी
पाडोळी गटातून बाबुराव पुजारी हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. पुजारी हे १९७१ पासून, म्हणजेच तब्बल ५५ वर्षांपासून पक्षात एकनिष्ठने कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या माध्यमातून त्यांनी पक्षसंघटना वाढवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, पक्षाने ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पक्षाने डावलले असले तरी मला जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
राणा पाटील समर्थक दयानंद शिंदे यांना उमेदवारी
दुसरीकडे, भाजपने या गटातून राणा पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे दयानंद शिंदे (रा. सांगवी) यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. शिंदे हे व्यावसायिक असून मागील २० वर्षांपासून ते धाराशिवमध्ये ‘डाटा नेट’ नावाचे कॉम्प्युटरचे दुकान चालवतात. तसेच त्यांचे स्थानिक राजकारणातही वर्चस्व आहे. दयानंद शिंदे यांनी सांगवी ग्रामपंचायतीचे सदस्यपद भूषवले आहे, तर त्यांच्या पत्नी वनमाला शिंदे या २०१५ ते २०२० या काळात सांगवीच्या सरपंच होत्या.
एका बाजूला संघाचे संस्कार व ५५ वर्षांची निष्ठा असणारे बाबुराव पुजारी आणि दुसऱ्या बाजूला राणा पाटील यांचे पाठबळ असलेले दयानंद शिंदे, तर शिवसेना ठाकरे गटाने ऍड. व्यंकट गुंड यांचे पुतणे अमोल गुंड यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे पाडोळी गटातील ही लढत अटीतटीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बाबुराव पुजारी यांच्या बंडखोरीचा भाजपला किती फटका बसणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






