धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीत बेंबळी गटावरून मोठी ठिणगी पडली आहे. हा गट तडजोडीमध्ये अजित पवार गटाला सोडण्यात आला असून, तेथे ‘बाहेरचा’ उमेदवार आयात करण्यात आल्याने भाजपच्या स्थानिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. या निर्णयामुळे भाजपचे दोन प्रमुख निष्ठावंत नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत.
‘बाहेरचा’ उमेदवार आणि स्थानिक असंतोष
महायुतीच्या जागावाटपात बेंबळी गटाची जागा अजित पवार गटाला सुटली असून, येथून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका धुरगुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, महेंद्रकाका धुरगुडे हे मूळचे तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ गावचे रहिवासी आहेत. त्यांचा बेंबळी गटाशी कोणताही थेट संपर्क किंवा संबंध नसल्याने, ऐन निवडणुकीत ‘बाहेरचा’ उमेदवार लादल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.
रामदास कोळगे समर्थकांचा संताप
या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपचे ज्येष्ठ नेते रामदास कोळगे (रा. रुईभर) यांना बसला आहे. कोळगे हे गेल्या ३५ वर्षांपासून भाजपमध्ये एकनिष्ठ असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व आहे. त्यांनी पक्षाचे सरचिटणीस आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदही भूषवले आहे.
इतकी वर्षे पक्षासाठी खर्ची घालूनही त्यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. कोळगे समर्थक भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत असून, कोळगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढावी, यासाठी आग्रही आहेत.
पांडुरंग पवारांना अश्रू अनावर
दुसरीकडे, बेंबळीचे स्थानिक कार्यकर्ते पांडुरंग पवार हे देखील या निर्णयामुळे व्यथित झाले आहेत. गेल्या २० वर्षांपासून भाजपची सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळताना, पक्षाची बाजू मांडल्यामुळे त्यांच्यावर अनेकदा पोलीस केसेस झाल्या आणि धमक्याही आल्या. तिकीट मिळण्याची खात्री असतानाच उमेदवारी नाकारल्याने पवार यांना अश्रू अनावर झाले. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत.
आयात उमेदवाराला संधी आणि निष्ठावंतांवर अन्याय, यामुळे बेंबळी गटात भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता रामदास कोळगे आणि पांडुरंग पवार बंडाचे निशाण फडकवून निवडणूक रिंगणात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





