मंडळी, राजकारण हे अनिश्चिततेचे क्षेत्र आहे, हे माहिती होते. पण ते इतके ‘विनोदी’ असू शकते, हे आज धाराशिवमध्ये सिद्ध झाले. गेले काही दिवस मल्लू नेरुळकर आणि त्यांच्या ‘सोशल मीडिया गँग’ने असा काही धुरळा उडवला होता की, जणू काही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ‘माऊलीं’साठी (अर्चना पाटील) आरक्षितच झाले आहे!
कवी कन्दीलकर असो, ढोकीकर असो, राणा २.० असो किंवा उमरग्याचे पाद्री… या सर्वांनी सोशल मीडियावर “लागा कामाला, माऊलीच अध्यक्ष होणार” अशा पोस्ट टाकून वातावरण इतके गरम केले होते की, बिचाऱ्या कार्यकर्त्यांना वाटले आता पेढे वाटायची तयारी करायला हवी. पण, नियतीचा (आणि भाजपच्या हायकमांडचा) खेळ बघा, सोशल मीडियावरचे राजे वास्तवात प्यादे ठरले!
ऑपरेशन ‘त्यागमूर्ती’: पुडी सोडली पण वास आला!
परवा दिवसभर धाराशिवच्या राजकीय कट्ट्यांवर एक जबरदस्त ‘स्क्रिप्ट’ चालवली गेली. मल्लू नेरुळकरांनी गणोजी शिर्के यांच्या कानात एक मंत्र फुकला आणि शहरात ब्रेकिंग न्यूजच्या पट्ट्या फिरू लागल्या—
“अर्चना ताईंनी ‘त्याग’ केला! सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून त्यांनी स्वतःहून माघार घेतली! त्यागमूर्तींचा विजय असो!”
वाह! काय ती स्क्रिप्ट, काय तो अभिनय! डोळ्यात पाणी आणणारा हा सीन होता. पण मंडळी, राजकारणात जेव्हा कुणी अचानक ‘संन्यासी’ वृत्ती दाखवू लागतो, तेव्हा समजायचे की पाणी कुठेतरी मुरतंय. हा ‘त्याग’ नव्हता, तर हा होता ‘नाईलाज’!
खरे तर, ‘माघार घेतली’ नाही, तर वरून ‘नारळ मिळाला’ आहे, हे लपवण्यासाठी हा सगळा खटाटोप होता. तिकीट कापले गेले, हे सांगणे इगोला परवडणारे नव्हते, म्हणून “आम्हीच नको म्हणालो” हा जुना फिल्मी डायलॉग मारण्यात आला.
बसवराज पाटलांचा ‘बॉम्ब’ आणि राणादादा ‘क्लीन बोल्ड’!
या इमोशनल ड्रामाचा फुगा भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील मुरूमकर यांनी एका झटक्यात फोडला. त्यांनी भाजपच्या ‘नवी दिल्ली’ पॅटर्नचे नियमच वाचून दाखवले:
नियम क्र. १: घरात आधीच आमदार किंवा खासदार असेल, तर जिल्हा परिषदेचे तिकीट मागू नये. (दुकानात एकच मालक हवा!)
आणि इथेच आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या होम पिचवर त्यांची विकेट पडली. राणादादा आमदार आहेत, त्यामुळे अर्चना ताईंना तिकीट देणे भाजपच्या तत्त्वात बसत नव्हते. त्यामुळे अध्यक्षपद ‘महिला ओपन’ असूनही, घरातल्या महिला नेत्याला मात्र सक्तीचा ‘रामराम’ करावा लागला.
आता ‘तो’ – ‘ती’ सामान्य कार्यकर्ता कोण?
मल्लू नेरुळकर आणि त्यांच्या गँगची अवस्था आता “आम्ही जातो आमुच्या गावा…” अशी झाली आहे. सोशल मीडियावर ज्या उत्साहात “आता माऊली…” च्या पोस्ट पडत होत्या, त्या आता हळूच डिलीट करण्याची वेळ आली आहे.
-
कवी कन्दीलकरांचा दिवा विझला आहे.
-
ढोकीकर आता डोकं धरून बसलेत.
-
आणि उमरग्याचे पाद्री नवीन प्रवचन शोधत आहेत.
प्रश्न आता एकच उरला आहे— “सामान्य कार्यकर्त्याला / कार्यकर्तीला संधी देणार” असे जे छातीठोकपणे सांगितले गेले, तो नशीबवान (की बळीचा बकरा?) सामान्य कार्यकर्ता / कार्यकर्ती कोण? की इथेही ‘सामान्य’च्या नावाखाली एखादे ‘असामान्य’ पार्सल आणून बसवणार?
राजकारणात ‘आगीशिवाय धूर निघत नाही’ म्हणतात, पण धाराशिवमध्ये ‘तिकीट कापल्यावरच त्यागाचा धूर निघतो’ हे नवीन समीकरण सिद्ध झाले आहे. माऊलींच्या सोशल मीडिया गँगला आता नवीन काम शोधावे लागेल, कारण— काटे उलटे फिरले आहेत!
– बोरूबहाद्दर





