धाराशिव: जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि थंडीच्या दिवसात जिल्ह्याचे राजकीय वातावरण एकदम तापले आहे. नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असली तरी, जिल्हा परिषदेच्या आखाड्यात खरी लढत रंगणार ती अर्चना पाटील विरुद्ध सक्षणा सलगर यांच्यातच! ही लढत नुसती लढत नसून प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याची जोरदार चर्चा आता गल्लीबोळात सुरू झाली आहे.
अर्चना पाटलांचा ‘कमळ’वारी प्रवास आणि अध्यक्षपदाचे स्वप्न
यंदाचे जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या खुर्चीवर भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा डोळा आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून ‘घड्याळ’ चिन्हावर लढताना अर्चना पाटील यांना तब्बल सव्वातीन लाखांच्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला होता. तो पराभव जिव्हारी लागल्याने आता त्या जिल्हा परिषदेच्या आखाड्यात थेट ‘कमळ’ हाती घेऊन उतरणार आहेत.
पवारांची ‘शेरनी’ मैदानात उतरणार?
अर्चना पाटलांचा मार्ग सुकर समजला जात असतानाच आता ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या फायरब्रँड नेत्या आणि युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे सक्षणा सलगर या ‘तेर’ गावच्या भूमिपुत्र आणि धनगर समाजाच्या ओबीसी नेत्या आहेत. शरद पवारांची ‘शेरनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सक्षणा यांनी अर्चना पाटलांविरोधात दंड थोपटल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
दबावतंत्राचे राजकारण सुरू?
अर्चना पाटील यांच्या विरोधात सक्षणा सलगर लढणार, ही कुणकुण लागताच पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या आहेत. सक्षणा यांनी ‘तेर’ गटातून निवडणूक लढवू नये यासाठी येनकेन प्रकारे दबावतंत्राचा वापर सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र, या दबावाला बळी न पडता सक्षणा सलगर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जर ही लढत झाली, तर ती या निवडणुकीतील सर्वात ‘हायव्होल्टेज ड्रामा’ ठरेल यात शंका नाही.
भाजपमध्ये ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘उपरे’ संघर्ष
एकीकडे ही लढत तर दुसरीकडे भाजपंतर्गत गटबाजीही उफाळून आली आहे. भाजपमध्ये सध्या इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून तीन गट पडले आहेत. एक गट आ. राणा पाटील यांचा, दुसरा बसवराज पाटील यांचा तर तिसरा निष्ठावंत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा! सुजितसिंह ठाकूर हे मूळच्या भाजप कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आग्रही आहेत, तर बाहेरून पक्षात आलेले (उपरे) राणा पाटील आणि बसवराज पाटील हे आपापल्या समर्थकांसाठी तिकीट मागत आहेत. त्यामुळे तिकिटाचे फायनल ‘कार्ड’ प्रदेश कार्यालयातून कोणाच्या नावावर फाडले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
असा आहे जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम
| टप्पा | तारीख | वेळ |
| निवडणूक अधिसूचना | १६ जानेवारी २०२६ | – |
| उमेदवारी अर्ज भरणे | १६ ते २१ जानेवारी २०२६ | – |
| अर्जांची छाननी | २२ जानेवारी २०२६ | – |
| अर्ज माघार | २७ जानेवारी २०२६ | दुपारी ३ वाजेपर्यंत |
| चिन्ह वाटप | २७ जानेवारी २०२६ | दुपारी ३.३० नंतर |
| मतदान | ५ फेब्रुवारी २०२६ | सकाळी ७:३० ते ५:३० |
| निकाल | ७ फेब्रुवारी २०२६ | सकाळी १० पासून |




