धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धाराशिव आणि कळंब तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती झाली असली तरी, उमेदवार निवडीवरून शिंदे गटात मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना थेट उमेदवारी दिली गेल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महायुतीत शिंदे गटाची जागा, पण उमेदवार भाजपचे!
महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जिल्हा परिषदेचा ‘पळसप’ गट, तर पंचायत समितीचे ‘जागजी’ आणि ‘येडशी’ हे गण आले आहेत. मात्र, या तिन्ही ठिकाणी पक्षाने स्वतःचे निष्ठावंत कार्यकर्ते सोडून चक्क भाजपच्या नेत्यांना उमेदवारी बहाल केली आहे. विशेष म्हणजे, या उमेदवारांचा अद्याप शिंदे गटात रीतसर पक्षप्रवेश झालेला नसतानाही त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना उमेदवारी, तालुकाप्रमुखावर अन्याय
पळसप जिल्हा परिषद गटासाठी शिंदे गटाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी बोंदर-पाटील रा. उत्तमी कायापूर ( (मूळ भाजप) यांना उमेदवारी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बोंदर-पाटील यांचे या मतदारसंघात मतदान देखील नाही. तरीही त्यांना पक्षाचा ‘ए’ फॉर्म देण्यात आला आहे. यामुळे शिंदे गटाचे निष्ठावंत तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांच्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे. लाकाळ यांना केवळ ‘बी’ फॉर्म देण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला असून, निष्ठावंताला डावलून ‘उपऱ्या’ उमेदवाराला संधी दिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. आता नेताजी बोंदर-पाटील हे ‘कमळ’ सोडून ‘धनुष्यबाण’ हाती घेणार आहेत.
पंचायत समितीतही भाजपचीच घुसखोरी
केवळ जिल्हा परिषदच नाही, तर पंचायत समितीच्या जागांवरही अशीच परिस्थिती आहे.
-
जागजी गण: पांडुरंग सावंत (मूळ भाजप)
-
येडशी गण: संतोष सस्ते (मूळ भाजप)
या दोघांनाही शिंदे गटाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. हे दोन्ही उमेदवार मूळचे भाजपचे असून, त्यांचा शिंदे गटात अधिकृत प्रवेश झालेला नाही.
पालकमंत्र्यांवर शिवसैनिक नाराज
पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आलेल्या या निवडणुकीत निष्ठावंतांना न्याय मिळण्याऐवजी भाजपच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केले जात असल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “पक्षाने स्वाभिमान गहाण ठेवून पक्ष भाजपच्या दावणीला बांधला आहे का?” असा संतप्त सवाल नाराज शिवसैनिकांकडून विचारला जात आहे.





