धाराशिव: जिल्ह्याच्या कारभाराचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आज सकाळी अचानक खाकी वर्दीने एन्ट्री घेतल्याने संपूर्ण आवारात एकच खळबळ उडाली. निमित्त होते शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या ‘शिस्तीच्या परीक्षेचे’! नेहमीप्रमाणे कामावर हजर झालेल्या ९ कर्मचाऱ्यांना आज नेहमीच्या फाईलऐवजी थेट पोलिसांच्या ब्रीद ॲनालायझरला सामोरे जावे लागले.
गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभागात ‘काहीतरी काळेबेरे’ असल्याची कुणकुण प्रशासनाच्या कानावर आली होती. काही कर्मचारी कर्तव्यावर असतानाच ‘टल्ली’ होऊन येत असल्याच्या गंभीर तक्रारी विभाग प्रमुखांपर्यंत पोहोचल्या होत्या. यामुळे कामात दिरंगाई, शिस्तभंग आणि एकूणच शैक्षणिक वातावरणाला गालबोट लागत होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी विभाग प्रमुखांनी थेट पोलिसांची मदत घेत एक सापळा रचला.
आज सकाळी कार्यालयात कामकाज सुरू होताच, पोलिसांनी थेट शिक्षण विभागात धडक दिली आणि संशयित कर्मचाऱ्यांना एका रांगेत उभे केले. एकामागून एक, प्रत्येकाच्या श्वासाची तपासणी करण्यात आली. या अनपेक्षित कारवाईमुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते, तर इतर कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली होती.
अहवाल निगेटिव्ह, पण संदेश गेला थेट!
जवळपास तासभर चाललेल्या या तपासणी नाट्यानंतर सर्व ९ कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. कोणीही मद्यप्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, “रिपोर्ट जरी निगेटिव्ह असला तरी आमचा उद्देश सफल झाला,” असे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. शासकीय कार्यालयात कामावर असताना मद्यप्राशन करण्याची हिंमत करणाऱ्यांना या निमित्ताने सणसणीत चपराक बसली आहे.
परंड्याच्या ‘त्या’ शिक्षकामुळे प्रशासन सतर्क
अलीकडेच परंडा तालुक्यातील एका शिक्षकाने शाळेतच मद्यधुंद अवस्थेत घातलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेने जिल्ह्याच्या आणि शिक्षण विभागाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला होता. त्या प्रकरणानंतर प्रशासनाने अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. आजची कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग मानला जात आहे.
थोडक्यात, आजच्या कारवाईतून प्रशासनाने एक स्पष्ट आणि खणखणीत संदेश दिला आहे – “कर्तव्यावर असाल तर शिस्तीत राहा, अन्यथा कारवाई अटळ आहे!”