नळदुर्ग – धाराशिव लाइव्हने गुटखा प्रकरणी मालिका प्रसिद्ध केली होती. अखेर याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंधारे यांच्यासह पाच पोलीसांची धाराशिव मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे.
निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही तरुणानी जबरदस्तीने आडवून तो सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता.
गुटख्याचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) पकडल्यानंतर गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) हा चांगलाच चिडला आणि हप्ता देऊन देखील गाड्या पकडत असाल तर काय उपयोग म्हणून सुनावल्यानंतर गोरेनी त्या टेम्पोमधील गुटखा चालकांमार्फत अज्ञात ठिकाणी उतरवून, रिकामा टेम्पो दाखवून दि. २१ जुलै रोजी गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. टेम्पो चालक सहदेव माडजे रा. कोंडजी ता. लोहारा यास मारहाण करून १२ लाखाचा आयशर टेम्पो आणि खिशातील ३५ हजार जबरदस्तीने पळवून नेल्याचा गुन्हा या झिरो पोलिसांवर दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या सांगण्यावरूनच आपण गुटख्याचा सदर टेम्पो ताब्यात घेतला पण पोलिसांनी वाटा देण्याऐवजी दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याने हे झिरो पोलीस चांगलेच चिडले. यातील सय्यद अमीर अझहर जहागीरदार याच्या चुलत्याने सर्व पुरावे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिल्याने गोरेंची अवघ्या चार दिवसात पोलीस मुख्यालयात उचलबांगडी झाली.
याप्रकरणी धाराशिव लाइव्हने गुटखा प्रकरणी मालिका प्रसिद्ध केली होती. अखेर याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंधारे यांच्यासह पाच पोलीसांची धाराशिव मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल सगर , नेताजी दगडू गेजगे, विश्वनाथ शिंदे, नितीन राठोड, बलदेवसिंग ठाकूर आदींचा समावेश आहे.