धाराशिव शहरातील रस्ते सध्या एका वेगळ्याच मोहिमेचा भाग बनले आहेत – ‘खड्डेविजय अभियान’. शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांनी इतका ताबा मिळवला आहे की, हे खड्डे आता पर्यटक आकर्षण बनतील अशी स्थिती आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षांत रस्त्यांच्या दुरुस्तीला कुठलीही यंत्रणा लागू नाही, त्यामुळे शहरातील नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक प्रवास हा जणू एक साहस बनले आहे. ज्यात वाहन चालवणारे आणि खड्डे यांच्यात जणू एक वेगळ्याच पातळीवरचा संवाद सुरू असतो. वाहनचालकांच्या मेंदूला इतकं ताण आलं आहे की, प्रवास करताना ‘जिवंत परत येतो का नाही’ हा एकच विचार त्यांच्या डोक्यात घोळत असतो.
प्रशासकाचे राज्य: खड्ड्यांच्या साम्राज्यात ‘प्रशासक’
धाराशिव नगर पालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकचं राज्य आहे. प्रशासनाने कदाचित ‘आपण या खड्ड्यांच्या राज्यात फक्त पर्यवेक्षकच आहोत’ असा विचार केल्यासारखं वाटतं. प्रशासक असला तरी कामं सुरू नाहीत आणि कर्मचारी तर शून्यच. त्यामुळे रस्त्याच्या ११० कामांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) सोपवण्यात आली आहे. याच विभागाने तब्बल एक वर्षापूर्वी कामासाठी टेंडर काढलं, वर्क ऑर्डरही निघाली, मात्र सहा महिने झाले तरी शहरातील १०० कामं अजूनही फाइल्समध्येच अडकून बसले आहेत.
राजकीय पुढाऱ्यांचा ‘कुशल’ खेळ: काम न करता लाखो मिळवा
रस्त्याच्या कामांमागे एक ‘गहन’ राजकीय खेळ सुरू आहे. सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी कामांचे छोटे छोटे तुकडे म्हणजेच १० ते १५ लाखांचे ‘अर्थपूर्ण’ ठेके दिले आहेत. या कंत्राटांमध्ये मजा म्हणजे कामाचा ‘अस्सल कंत्राटदार’ वेगळा आणि काम करणारा कार्यकर्ता वेगळा. कार्यकर्त्यांच्या हातात यंत्रणा नाही, साधे पैसे नाहीत, मग काम करणार कसं? त्यामुळे एकही काम पूर्ण होणार नाही, याची हमी आहे. अशा स्थितीत रस्त्यांवरच्या खड्ड्यांनी मात्र स्थानिकांना ‘काय होणार याचा अंदाज लावा’ असा खेळ खेळायला भाग पाडलं आहे.
रस्त्यांवरील बळी: खड्ड्यांच्या साम्राज्याचा पहिला शिकार
रस्त्यांवरील खड्डे आता केवळ त्रासदायकच नाहीत तर जीवघेणेही ठरले आहेत. गुरुवारी रात्री ओंकार जाधवर (वय २२) या तरुणाचा खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. खड्डे पडले आणि तरुणाचा बळी गेला, मात्र यावर राजकारण सुरू झालं. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने लगेच आंदोलनाचा ‘ड्रामा’ केला, कार्यकारी अभियंत्याला घटनास्थळी आणून मोठं नाटक केलं. प्रश्न असा आहे की, गेल्या तीन वर्षांत ही परिस्थिती चालू असताना त्यांना आंदोलन करण्याची गरज वाटली नाही. आता निवडणुका लागल्यावरच अचानक त्यांना खड्ड्यांचा त्रास आठवला का?
ड्रामा किंवा काम? निवडणुका जवळ आल्यावरच खड्ड्यांवर लक्ष
निवडणुका जवळ आल्यावर धाराशिवच्या रस्त्यांच्या ‘दुर्दशे’चा वापर राजकीय नेते करू लागले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असले तरी त्याच खड्ड्यांना आता राजकारणाचा भाग बनवण्यात आलं आहे. रस्त्यांवरील खड्डे हे जणू निवडणुकांच्या प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनले आहेत. प्रशासनाच्या गलथानपणामुळे आणि राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्ता व्रात्यतेमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत आहे.
आता प्रश्न उरतो की, रस्त्यांवरील हे खड्डे कधी बुजणार? आणि राजकीय ड्राम्यात गमावलेल्या कामांचं काय होणार? धाराशिवचे नागरिक या सगळ्या ‘खड्डेविजय अभियानाचा’ शेवट कधी पाहणार?