बेंबळी – धाराशिव तालुक्यातील धारूर येथे गुरुवारी सकाळी एका दुकानात झालेल्या चोरीच्या संशयावरून दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून, पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १३ जणांवर मारहाण, गैरकायदेशीर मंडळी जमवणे आणि जातीवाचक शिवीगाळ करणे (ॲट्रॉसिटी) यांसारख्या गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली तक्रार:
यातील पहिली तक्रार अहिरिंग्या बब्रुवान भोसले (वय ५५, रा. धारुर) यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास धारूर येथील महेश गुरव यांच्या पत्र्याच्या गाळ्यासमोर, श्रीराम कदम, विठ्ठल कदम, कृष्णा कदम, महेश गुरव, संभाजी कदम, विशाल कदम आणि इतर एकाने “दुकानात चोरी कोणी केली ते सांग,” असे म्हणत गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, लोखंडी पाईप आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. या तक्रारीवरून बेंबळी पोलिसांनी सात जणांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवला आहे.
दुसरी (परस्परविरोधी) तक्रार:
याच घटनेप्रकरणी दुसऱ्या गटातील श्रीराम दत्तु कदम (वय ३६, रा. धारुर) यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, धारूर येथील शंभुराजे चौकात ते आणि त्यांचे भाऊ विठ्ठल कदम यांनी दुकानात झालेल्या चोरीबद्दल काही माहिती आहे का, असे विचारले. याचा राग मनात धरून रंजन शिंदे, प्रदीप शिंदे, हिरामण भोसले, शोभा भोसले, विशाल भोसले आणि प्रियंका भोसले यांनी गैरकायदेशीर मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, लोखंडी सळई व काठीने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एकाच वेळी, एकाच कारणावरून दोन गटांत झालेल्या या राड्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेंबळी पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.