धाराशिव – पत्नीला नांदायला का पाठवत नाही, या कारणावरून झालेल्या वादातून पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पतीला आणि त्याच्या घरच्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील दाऊतपूर येथे घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.
याप्रकरणी भावेश भास्कर गडदे (वय २६, रा. दाऊतपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दाऊतपूर येथे घडली. फिर्यादी भावेश गडदे यांच्या पत्नीच्या नांदण्याच्या कारणावरून वाद सुरू होता. याच वादातून आरोपी संदिपान थोरात, विशाल संदिपान थोरात (दोघे रा. दाऊतपूर), चांगदेव गोपीनाथ थोरात (रा. लातूर), हनुमंत थोरात, केशरबाई हनुमंत थोरात (दोघे रा. धाराशिव), बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर बंकट थोरात, सखुबाई पांढरे (तिघे रा. दाऊतपूर), संपत्ती देवकर आणि श्रीमंत देवकर (दोघे रा. येळी, ता. औसा, जि. लातूर) यांनी एकत्र येऊन भावेश गडदे यांच्या घरी गेले.
तेथे त्यांनी भावेश आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जखमी केले. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
भावेश गडदे यांनी १२ ऑगस्ट रोजी ढोकी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरील दहा आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(१), १८९(२), १९१(१), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२), आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.