धाराशिव: जिल्ह्यातील पवनचक्की उभारणीच्या कामावरून सुरू असलेल्या वादाने आज उग्र स्वरूप धारण केले. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याच्या आणि त्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याच्या आरोपांवरून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंद पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेली ही बैठक अखेर कोणताही तोडगा न निघता गुंडाळावी लागली.
धाराशिव जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर पवनचक्की उभारणीचे प्रकल्प सुरू आहेत. मात्र, या प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करताना कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आणि त्यांना अत्यल्प मोबदला दिला जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला खासदार निंबाळकर यांनी जागजी गावातील एका शेतकऱ्याचे पत्र सादर करत पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा उपस्थित केला. कंपन्या कशाप्रकारे शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहेत आणि प्रशासनाची भूमिका काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावर आनंद पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत खासदार निंबाळकर यांच्यावरच गंभीर आरोप केले. “खासदारांचे मामाच या पवनचक्की प्रकल्पात कॉन्ट्रॅक्टर आहेत,” असा थेट आरोप पाटील यांनी केला. या आरोपानंतर बैठकीत एकच गोंधळ उडाला. खासदार निंबाळकर यांनी या आरोपावर तीव्र आक्षेप घेत पाटील यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले.
दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक वाढल्याने आणि वातावरण तंग झाल्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजू ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर त्यांना बैठक संपल्याचे जाहीर करावे लागले. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बोलावलेली ही महत्त्वपूर्ण बैठक नेत्यांच्या आपसी वादामुळे निष्फळ ठरल्याने उपस्थितांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Video