ढोकी: आरणी पाटी (ता. धाराशिव) येथे एका ५० वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लोखंडी रॉड, दगड आणि काठीने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मारहाणीसोबतच आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नंदकिशोर किशनराव शिंदे (वय ५०, मूळ रा. आरणी पाटी, सध्या रा. खराडी, पुणे) हे दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास आरणी पाटी येथील एका पत्र्याच्या शेडसमोर थांबले होते.
त्यावेळी आरोपी अजित सहदेव जगताप आणि आकाश युवराज गरड (दोघे रा. आरणी) तिथे आले. त्यांनी जुन्या वादातून किंवा अन्य कारणावरून शिंदे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर लोखंडी रॉड, दगड आणि काठीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या झटापटीत आरोपींनी शिंदे यांच्या मोटरसायकलचीही मोठी तोडफोड केली आणि जाताना “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली.
घटनेनंतर फिर्यादी शिंदे यांनी उपचार आणि इतर कारणांमुळे उशिरा तक्रार दिली. अखेर दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी नंदकिशोर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११८(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३२४(४) (मालमत्तेचे नुकसान), ११५ (दुखापत), ३५२ (शांतता भंग), ३५१(२)(३) (गुन्हेगारी धमकी) आणि ३(५) (संगनमत) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






