ढोकी – धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे कत्तलीच्या उद्देशाने चार गायींची पिकअप वाहनातून निर्दयतेने वाहतूक करताना एका व्यक्तीस पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे १ लाख १ हजार रुपये किमतीच्या गायी आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १७ एप्रिल २०२५) सायंकाळी सुमारे ७ वाजता ढोकी येथील एमएसईबी कार्यालयाच्या बाजूच्या रस्त्यावर एक पिकअप वाहन (क्र. एमएच १३ सीजे ०११४) संशयास्पदरीत्या जात होते. ढोकी पोलिसांनी हे वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये गोवंश जातीच्या ४ जर्सी गायी आढळून आल्या. या गायींची किंमत अंदाजे १ लाख १ हजार रुपये आहे.
आरोपी चालक इक्बाल जाफर कुरेशी (वय ३५, रा. दत्तनगर, ढोकी, ता. जि. धाराशिव) याने गायींसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. त्यांना अत्यंत निर्दयतेने वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ही वाहतूक पूर्णपणे बेकायदेशीर होती.
या प्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली असून, आरोपी इक्बाल कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (कलम ५(अ), ५(ब)), महाराष्ट्र पोलीस कायदा (कलम ११९), प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम (कलम ११(१) च्या विविध उपकलमांनुसार) आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांन्वये (कलम ४७, ४८, ५३, १५८/१७७) गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.