ढोकी : लातूर ते बार्शी जाणाऱ्या रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका मोठ्या टोळीचा कट ढोकी पोलिसांनी उधळून लावला आहे. रविवारी (दि. १४) पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून ८ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून कार आणि घातक शस्त्रांसह ५ लाख ५ हजार ७०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे २:१५ वाजण्याच्या सुमारास ढोकी पेट्रोल पंप चौकात काही संशयीत हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत लातूर-बार्शी रोडवर थांबलेल्या होंडा कारला (क्र. एमएच १२ डी.सी. ९०००) घेरले.
यावेळी कारमध्ये आणि कारच्या बाहेर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जमलेल्या ८ जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी कत्ती, सत्तूर, दोन मार्तुल, वायर कटर, लोखंडी पाने, हातोडा, विळा, रॉड तसेच मिरची पावडर आणि ५० फूट वायर असे दरोड्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १. अशोक शहाजी शिंदे (वय ४० वर्षे) २. सुरेश रमन शिंदे (वय २९ वर्षे) ३. विजय शहाजी शिंदे (वय २२ वर्षे) ४. बबीता अनिल पवार (वय ५५ वर्षे) ५. नितीन अशोक शिंदे ६. सचिन अशोक शिंदे (सर्व रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) ७. ज्ञानेश्वर दत्ता कोळपे (वय २० वर्षे) ८. महादेव दत्ता कोळपे (वय २४ वर्षे, दोघे रा. जागजी, जि. धाराशिव)
याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बापुजी गोपाळराव पुरके यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(४) आणि ३१०(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.






