मुंबई: राज्यातील लोकनाट्य कलाकेंद्रांमध्ये पारंपरिक वाद्यांऐवजी डीजे साऊंड सिस्टीमचा वाढता वापर होत असल्याच्या गंभीर समस्येची अखेर महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे. अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर, राज्याच्या गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस आयुक्तांना डीजे सिस्टीम वापरणाऱ्या कलाकेंद्रांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम रंगराव जावळे, महिला अध्यक्ष सुरेखा पुणेकर आणि खजिनदार चंद्रकांत लाखे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशजी कदम यांना एक पत्र लिहून ही गंभीर समस्या मांडली होती. या पत्रानुसार, महाराष्ट्रातील अनेक कलाकेंद्रांना परवानगी देताना लाईव्ह ढोलकी, पेटी, तबला आणि गायिका असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, राज्यातील सुमारे ३८ ते ४० कलाकेंद्रे या नियमांचे उल्लंघन करून डीजेसाऊंड सिस्टीमवर कला सादर करत आहेत. विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील आळणी आणि चोराखळी येथील काही केंद्रांमध्येही हाच प्रकार सर्रास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा गळा घोटला जात असून, पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. डीजेच्या वापरामुळे ढोलकी, पेटी, तबला वादक आणि गायक कलाकारांचा रोजगार हिरावला जात आहे. त्यामुळे, तात्काळ संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आदेश देऊन डीजे सिस्टीम वापरणाऱ्या केंद्रांवर कारवाई करावी आणि कलावंतांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली होती.
या तक्रारीची दखल घेत गृह विभागाचे अवर सचिव प्रकाश घाडगे यांच्या सहीने एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, “ज्या कलाकेंद्रांमध्ये डिजेद्वारे कला सादर केली जात असल्याचे आढळून येईल, अशा केंद्रांवर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी आणि केलेल्या कारवाईबाबत तक्रारदार व शासनाला अवगत करावे. शासनाने या प्रकरणात संबंधित कला केंद्रांचा परवाना रद्द करण्याची मागणीही विचारात घेतली आहे.
धाराशिवमध्ये सर्रास नियमभंग, प्रशासनाचे दुर्लक्ष?
धाराशिव जिल्ह्यातील विशिष्ट कला केंद्रांमध्ये नियमांना सर्रास पायदळी तुडवले जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार:
- आळणी: २ कलाकेंद्र
- चोराखळी: २ कलाकेंद्र
- वडगाव: १ कलाकेंद्र
या एकूण पाचही कलाकेंद्रांमध्ये पारंपरिक ढोलकी, तबला, पेटीऐवजी डीजे साऊंड सिस्टीमचा दणदणाट सुरू आहे. विशेष म्हणजे, ही कलाकेंद्रे पहाटेपर्यंत सुरू राहत असूनही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला ‘हप्ता’ जात असल्यामुळे या अवैध प्रकाराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.