धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ४) मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीमुळे जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
मुंबई येथे झालेल्या या नियुक्ती सोहळ्याप्रसंगी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस रविंद्र पवार, राज्याचे सरचिटणीस बबन कनावजे, आणि ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्ष अमृता काळदाते यांचा समावेश होता.
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्हा संघटनेत संघटनात्मक फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू होती. विशेषतः, नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी नगराध्यक्षपदाच्या जागांवरून नाराज होऊन राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन जिल्हा संघटनेत बदल करण्याची आग्रही मागणी केली होती. या बैठकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून तात्काळ निर्णय घेण्यात आला. डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे सक्रिय आणि सर्वसमावेशक नेतृत्व लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, “डॉ. पाटील यांच्या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल.”
पक्षाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करणार : डॉ. प्रतापसिंह पाटील
आपल्या निवडीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जिल्ह मधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटना मजबूत करण्याचे काम करणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी समन्वय साधून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी २४ तास उपलब्ध राहीन.”





