धाराशिव: दुधगाव (ता. जि. धाराशिव) येथील शासकीय निधीचा आणि मालमत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरोधात दाखल तक्रारीवर ४ मार्च २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), डॉ. मैनाक घोष यांच्या दालनात सुनावणी पार पडली. तय्यब महमुद हानिफ शेख यांनी १५ जानेवारी २०२५ रोजी ही तक्रार दाखल केली होती.
काय आहे प्रकरण?
अर्जदार शेख यांनी दुधगाव येथील शासकीय सांस्कृतिक सभागृहाच्या जागेवरील अतिक्रमणास सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून सहकार्य केले, तसेच शासकीय निधी व मालमत्तेचा गैरवापर केला, असा आरोप केला होता. यासह गावातील इतर विकास कामांमध्ये अनियमितता असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
ग्रामपंचायतीचा खुलासा
सुनावणीदरम्यान, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी लेखी खुलासा सादर केला. यानुसार, तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यात तथ्य आढळले नाही. १९९२-९३ मध्ये आमदार निधीतून बांधलेल्या सांस्कृतिक सभागृहावरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी जिल्हा पॅनलवरील वकिलाची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली असून, वकील मिळाल्यानंतर न्यायालयात दावा दाखल केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
तसेच, जि. प. शाळा दुरुस्ती, शाळेला संरक्षक भिंत, दफनभूमीस संरक्षक भिंत, रस्ता बांधकाम, साईट पट्ट्या भरणे, स्मशानभूमी पोहोच रस्ता, सांडपाणी व्यवस्थापन आणि दफनभूमी शेड या कामांची राज्य गुणवत्ता निरीक्षक व शाखा अभियंता यांनी चौकशी केली असून, त्यातही काही अनियमितता आढळली नसल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आणि ग्रामपंचायतीने सादर केलेल्या खुलाशानुसार, तक्रारीमध्ये प्रथमदर्शनी तथ्य नसल्याचे दिसून येत असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांनी नोंदवले. मात्र, अर्जदारास यावर आक्षेप असल्यास, त्यांनी ७ दिवसांच्या आत सबळ पुराव्यांसह अर्ज सादर करावा. असा अर्ज प्राप्त झाल्यास, पुढील चौकशीसाठी तो गट विकास अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांचा अभिप्राय मागवला जाईल, असे CEO डॉ. घोष यांनी स्पष्ट केले.