तुळजाभवानी मातेच्या पवित्र भूमीत सध्या राजकारणाचा जो उकिरडा झाला आहे, तो पाहता ‘संस्कारी पक्ष’ म्हणून मिरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. तुळजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने ज्या उमेदवाराला तिकीट दिले आहे, तो काही सामान्य कार्यकर्ता नाही. ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्यात महिनाभर जेलची हवा खाून, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटलेला ‘पिटू उर्फ विनोद गंगणे’ हा भाजपचा शहराचा ‘प्रथम नागरिक’ पदाचा उमेदवार आहे. या निर्णयामुळे तुळजापूरकरांच्या मान शरमेने खाली गेल्या आहेत.
गुन्हेगारांना राजाश्रय: हाच का भाजपचा ‘चाल, चेहरा आणि चारित्र्य’?
आधी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वर-कदम आणि बापू कणे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन पवित्र तुळजापूरला ‘उडता पंजाब’ बनवण्याचा पाया रचला गेला. आणि आता ते कमी म्हणून की काय, थेट ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन भाजपने गुन्हेगारीला अधिकृत राजाश्रय दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले, तेव्हा अपेक्षित होते की स्थानिक नेतृत्व यावर काहीतरी नैतिक भूमिका घेईल. मात्र, घडले भलतेच!
राणा पाटलांचा अजब दावा: गुन्हेगार की ‘पोलीस खबरी’?
स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना लिहिलेले उत्तर वाचून हसावे की रडावे, हेच कळत नाही. राणा पाटील म्हणतात की, गंगणे यांनी पोलिसांना ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणण्यासाठी मदत केली होती. अहो राणादादा, हे असले बालिश स्पष्टीकरण कोणाला देताय? उच्चशिक्षित समजल्या जाणाऱ्या तुम्हाला हे साधे लॉजिक समजत नाही का, की जसे ड्रग्ज विकणे गुन्हा आहे, तसे ड्रग्ज सेवन करणे हा देखील तितकाच मोठा गुन्हा आहे? की तुमच्या सोयीच्या राजकारणासाठी गुन्ह्याच्या व्याख्याही आता बदलल्या आहेत?
पिटू गंगणे: ‘देवदूत’ की ‘गुन्हेगार’?
ज्या व्यक्तीला तुम्ही ‘पोलीस मित्र’ म्हणून रंगवू पाहत आहात, तो पिटू उर्फ विनोद गंगणे काही साधा समाजसेवक नाही. त्याच्यावर केवळ ड्रग्जचेच नाही, तर तुळजापूर पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी खंडणी, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि मटका बुकी चालवणे असे तब्बल १५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्याच्यावर कायद्याचा बडगा उगारला गेला पाहिजे, त्याला तुम्ही थेट सत्तेच्या खुर्चीवर बसवायला निघालात?
राणा पाटलांना आमचा थेट सवाल आहे- तुमची अशी कोणती ‘मजबुरी’ आहे की, असा कुख्यात गुन्हेगार तुम्हाला अचानक ‘देवदूत’ वाटू लागला आहे? तुळजापुरात भाजपला एकही स्वच्छ प्रतिमेचा कार्यकर्ता मिळाला नाही का?
भ्रष्टाचाराचा वारसा आणि सत्तेची हाव
गंगणे यांची पार्श्वभूमी केवळ गुन्हेगारीपुरती मर्यादित नाही, तर ती भ्रष्टाचारानेही बरबटलेली आहे. त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष असताना पिटू गंगणेच पडद्यामागून कारभार हाकत होता, हे उभा महाराष्ट्र जाणतो. त्या काळात यात्रा अनुदान घोटाळा आणि डिझेल घोटाळ्यासारखे १५ हून अधिक घोटाळे उघडकीस आले होते. त्याच भ्रष्ट कारभाराची पुनरावृत्ती करण्यासाठी राणा पाटील एवढे उतावीळ का झाले आहेत?
तुळजापूरच्या जनतेला काय संदेश देताय?
एका बाजूला पंतप्रधान आणि गृहमंत्री गुन्हेगारी मुक्त भारताची भाषा करतात आणि दुसरीकडे त्यांचेच आमदार एका कुख्यात गुन्हेगाराला, मटका बुकीला आणि ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला शहराचा ‘राजा’ बनवायला निघाले आहेत. आमदार साहेब, सत्तेसाठी किती लाचार व्हायचे, यालाही काही सीमा असतात.
तुळजापूरच्या जनतेने या भुलथापांना बळी न पडता, ‘गुन्हेगारीला राजाश्रय’ देणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच ठेचणे गरजेचे आहे. अन्यथा, तुळजापूरची ओळख ‘भक्तीचे पीठ’ न राहता ‘गुन्हेगारांचा अड्डा’ अशी व्हायला वेळ लागणार नाही, आणि त्याचे एकमेव जबाबदार आमदार राणा पाटील असतील!
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह






