धाराशिव: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातून अनेक ट्रक मदत सामग्री घेऊन धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र, या मदत साहित्याच्या पिशव्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर ‘प्रसिद्धीचा सोस’ असल्याची टीका केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाच्या शिवसेनेने पुढाकार घेत जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे आणि भांड्यांसारखे साहित्य भरलेले ट्रक मदतीसाठी पाठवले आहेत. मात्र, या मदत सामग्रीवर नेत्यांचे फोटो असल्याने नागरिकांमधून आणि राजकीय वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाने या कृतीवर जोरदार आक्षेप घेत, संकटकाळातही शिंदे गट प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
फोटो नव्हे, मदत पाहा – एकनाथ शिंदे
या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा काळात राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “सध्या लोक एका कपड्यावर आहेत, त्यांना मदत पोहोचणे सर्वात महत्त्वाचे आहे. आम्ही कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत. यात कोणीही राजकारण आणू नये.”
फोटो लावल्याच्या आरोपांवर बोलताना शिंदे म्हणाले, “कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीत बॅगमध्ये काय आहे यावर लक्ष दिले पाहिजे, फोटोवर नाही. ज्यांना आरोप करायचे आहेत, त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. हे अस्मानी संकट मोठे आहे आणि आपण सर्वांनी मिळून शक्य तितकी मदत केली पाहिजे.” त्यांनी सर्वांना राजकारण बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त करंजा गावाची पाहणी, मदतीचे आश्वासन
धाराशिव: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परंडा तालुक्यातील पूरग्रस्त करंजा गावातील शिंदे वस्ती आणि करळे वस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हेही उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी एनडीआरएफच्या बोटीने प्रवास करून पूरग्रस्त भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बाधितांना धीर देत, “तुमचे नक्कीच पुनर्वसन करण्यात येईल. मदतीसाठी असलेले अटी व नियम शिथिल केले जातील आणि कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असे आश्वासन श्री. शिंदे यांनी दिले.
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तात्काळ मदत दिली जाईल आणि पूर्णपणे खरडून गेलेल्या जमिनींसाठी मदतीचे निकष बदलण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.