धाराशिव: घराशेजारील जागेत सांडपाणी सोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादात ७५ वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना जहागीरदारवाडी तांडा (ता. जि. धाराशिव) येथे घडली. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारहाण प्रकरणी शिवाजी लिंबा जाधव (वय ७५ वर्षे, रा. जहागीरदारवाडी तांडा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
फिर्यादी शिवाजी जाधव आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. सांडपाणी जागेत सोडण्याच्या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवाजी जाधव यांच्याशी वाद घातला. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच दगडाने मारून जखमी केले. याशिवाय आरोपींनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी खालील ७ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. पृथ्वीराज सुनिल जाधव २. सुनिल उत्रेश्वर जाधव ३. मंदाकिनी सुनिल जाधव ४. नेहा सुनिल जाधव ५. गुलाब उत्रेश्वर जाधव ६. सगुणा गुलाब जाधव ७. त्रत्वीक गुलाब जाधव (सर्व रा. जहागीरदारवाडी तांडा)
शिवाजी जाधव यांनी गुरुवारी (दि. १८) दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) (स्वेच्छेने दुखापत करणे), ११५(२), ३५२ (शांतता भंग), ३५१(२)(३) (गुन्हेगारी धमकी), १८९(२) (बेकायदेशीर जमाव), १९१(२) (दंगल) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






