नळदुर्ग : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंधोरा पाटी, सलगरा आणि चिवरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी हैदोस घालत विद्युत ट्रान्सफॉर्मर, केबल्स आणि ऑईल असा एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात एकाच दिवशी चोरीचे स्वतंत्र ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत रावसाहेब भानुदास शेंडे (वय ४३, सध्या रा. एस टी कॉलनी, तुळजापूर, मूळ रा. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. शेंडे हे रिन्यु ग्रीन एनर्जी सोल्युशन्स या कंपनीत कार्यरत असून, कंपनीच्या विविध साईट्सवर या चोऱ्या झाल्या आहेत.
चोरीच्या घटनांचा तपशील खालीलप्रमाणे:
१. पहिली घटना (गंधोरा पाटी): दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी गंधोरा पाटी येथे अज्ञात व्यक्तीने कन्व्हर्टर पॅनल, सेफ्टी चैन, रोटर पॉवर केबल, नेटवर्क केबल आणि इतर ॲक्सेसरीज असा एकूण १,००,००० रुपयांचा माल चोरून नेला.
२. दुसरी घटना (गंधोरा पाटी): दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी गंधोरा पाटी येथीलच आर एस एल २७ ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि ट्रान्सफॉर्मरच्या ॲक्सेसरीज असा एकूण ९५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.
३. तिसरी घटना (सलगरा ते शिमदरा तांडा): सलगरा ते शिमदरा तांडा येथील २.५ किमी अंतरावरील सबस्टेशन दरम्यानच्या सुमारे २.५ किमी लांबीच्या वीज वाहिन्या चोरट्यांनी कापून नेल्या. ही चोरी अंदाजे ९०,००० रुपयांची आहे.
४. चौथी घटना (चिवरी ते आरळी): चिवरी ते आरळी आणि हगलुर ते मानेवाडी हद्दीत रिन्यु ग्रीन एनर्जी सोल्युशन्स कंपनीने उभारलेल्या लाईनचे ८ पोल व त्यावरील पॅन्थर लाईन कंडक्टर्स (वायर्स) असा एकूण ८०,००० रुपयांचा माल चोरला गेला.
या सर्व प्रकरणांत रावसाहेब शेंडे यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध ४ स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.






