धाराशिव जिल्ह्यावर ज्या वरुणराजाने अनेक वर्षे पाठ फिरवली होती, तोच यावर्षी जणू काहीतरी विसरल्यासारखा परत आला होता. जिल्हा दुष्काळी आहे हे विसरून तो इतका बरसत होता की, नदी-नाले, ओढे आणि धरणं ‘आता बास रे बाबा!’ म्हणू लागली होती. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रात्री कळंब आणि वाशी तालुक्यात तर आभाळच फाटलं. तेरणा आणि मांजरा नद्यांनी आपले किनारे सोडून थेट गावातच घुसखोरी केली. अनेक गावांचा संपर्क तुटला, पूल पाण्याखाली गेले आणि प्रशासन हतबल झाले.
याच हाहाकारात, कळंब तालुक्यातील खोंदला गावातून एक हृदयद्रावक बातमी आली. सुबराव शंकर लांडगे नावाचे एक पासष्ट वर्षांचे शेतकरी मांजरा नदीच्या पुलावरून जाताना तोल जाऊन पुरात वाहून गेले होते. सकाळपासून NDRF चे पथक आणि गावकरी त्यांचा शोध घेत होते, पण नदीचे रौद्ररूप पाहता आशा कमीच होती.
गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सुबराव यांच्या घरासमोर गर्दी जमली होती. बायकांचे रडणे आणि पुरुषांची हताश चेहऱ्यावरील शांतता… वातावरण गंभीर होते. आणि याच गंभीर वातावरणात, फेसबुक पिंट्या यांची चकचकीत गाडी चिखल उडवत दाखल झाली.
गाडीतून उतरताच पिंट्यांनी परिस्थितीचा ‘ आढावा’ घेतला, पण हा आढावा डोळ्यांनी कमी आणि मोबाईलच्या कॅमेऱ्याने जास्त घेतला जात होता. त्यांनी सुबराव यांच्या कुटुंबाला किंवा जमलेल्या गावकऱ्यांना धीर देण्याची तसदी घेतली नाही. त्यांचा ‘इव्हेंट मॅनेजर’ ढोकीकर याने पटकन गाडीतून ट्रायपॉड काढला, मोबाईल त्यावर लावला आणि पिंट्यांनी आपला सदरा व्यवस्थित करत बटण दाबले… ‘पिंट्या भाऊ is now Live.’
“धाराशिव जिल्ह्यातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो…” पिंट्यांचा गंभीर आवाज फेसबुकवर घुमू लागला. “आज खोंदला गावावर मोठे संकट आले आहे. आपले एक शेतकरी बंधू पुरात वाहून गेले आहेत. ही बातमी समजताच, मी माझे सर्व कार्यक्रम रद्द करून थेट घटनास्थळी धाव घेतली आहे.”
पिंट्या बोलत होते आणि मागे सुबराव यांचा मुलगा हताशपणे नदीकडे पाहत होता. पण कॅमेऱ्याचा अँगल फक्त पिंट्यांच्या ‘काळजीवाहू’ चेहऱ्यावर स्थिर होता.
“मी इथे येताच NDRF च्या टीमला सूचना दिल्या आहेत. मी स्वतः बोटीने जाऊन शोधकार्यात मदत करणार होतो, पण अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मला थांबवले,” पिंट्यांनी अशी काही थाप मारली, जणू तेच ‘मांझी – द माउंटन मॅन’ होते. “पण तुम्ही काळजी करू नका. तुमचा भाऊ इथेच आहे. मी परिस्थितीवर ‘पर्सनली’ लक्ष ठेवून आहे. मी सरकारकडे तातडीने मदतीची मागणी…”
पिंट्यांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच गर्दीतून एक वयस्कर आजोबा पुढे आले आणि थेट लाईव्हच्या कॅमेरासमोर येऊन गरजले, “अरे लाज वाटते का नाही रं तुला? आमचा मानूस गेलाय पाण्यात, त्याचा जीव टांगणीला लागलाय… आन तू इथं येऊन फेसबुकावर तुझा बाजार मांडलायस? एवढा ‘चिप’ नेता आजवर पाहिला नाही!”
क्षणभर शांतता पसरली. लाईव्ह व्हिडिओमध्ये आजोबांचा संताप जसाच्या तसा रेकॉर्ड झाला. पिटूने पटकन पुढे होऊन कॅमेरा बाजूला केला, पण व्हायचे ते नुकसान होऊन चुकले होते. पिंट्यांचा चेहरा पांढराफटक पडला. त्यांनी घाईघाईने लाईव्ह बंद केला.
लोक आता उघडपणे कुजबुजू लागले होते. “माणूस मेलाय, त्याला शोधायचं सोडून ह्याला लाईक्स आणि कमेंट्सची पडलीय,” एक तरुण संतापाने म्हणाला.
अपमानाने लालबुंद झालेले पिंट्या क्षणाचाही विचार न करता गाडीत बसले आणि धुळ उडवत निघून गेले. NDRF चे पथक आपले काम करतच राहिले. गावकरी हताशपणे नदीकडे पाहत राहिले. सुबराव यांचा शोध सुरूच होता.
थोड्या वेळाने लोकांच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आले. फेसबुक पिंट्यांनी एक नवीन पोस्ट टाकली होती:
“खोंदला येथील पूरग्रस्तांच्या वेदना पाहून मन हेलावले. काही समाजकंटकांनी माझ्या मदतकार्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, पण मी डगमगणार नाही. मी तुमच्यासोबत आहे! #PintyaWithKhondala #DisasterRelief #SelflessService”
पोस्टसोबत त्यांनी लाईव्हमधील एक स्क्रीनशॉट टाकला होता, ज्यात त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर आणि काळजीत दिसत होता. (अर्थात, आजोबांनी झापायच्या दोन सेकंद आधीचा तो फोटो होता.)
पुढील भागात भेटूया…
- बोरूबहाद्दर