मागील भागात आपण पाहिले: ‘शिखर नाट्या’वरून पिंट्याची चांगलीच भंबेरी उडाली होती. पण पिंट्याला संकटातून संधी आणि संधीतून इव्हेंट कसा करायचा, हे अचूक माहीत होते…
एकीकडे वरुणराजा धाराशिव जिल्ह्यावर इतका मेहेरबान झाला होता की, जिल्ह्याचा ‘दुष्काळी’ हा शिक्का पुसून थेट ‘महापूरग्रस्त’ असा नवा शिक्का बसतो की काय, अशी भीती वाटू लागली होती. सोयाबीनची शेती आता ‘वॉटर पार्क’ झाली होती. उडीद-मुगाच्या पिकांनी पाण्यातून माना बाहेर काढून “वाचवा! वाचवा!” असा आक्रोश मांडला होता. शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी आणि डोळ्यात गळाभर पाणी साचले होते. कित्येक एकर जमिनीतील माती वाहून गेली, दोन शेतकऱ्यांनी जीव गमावला आणि अनेक मुकी जनावरे पुरात वाहून गेली. उरल्यासुरल्या जनावरांवर वाघ-बिबट्यांनी मोर्चा उघडला होता.
थोडक्यात, बळीराजा चारी बाजूंनी नागवला जात होता. पीक विम्याची आशा होती, पण त्याच्या अटी इतक्या जाचक होत्या की, विमा मिळवण्यापेक्षा थेट विमा कंपनीच्या मालकाला किडनॅप करणे सोपे होते.
संपूर्ण जिल्हा जेव्हा या जलसंकटात होरपळत होता, तेव्हा आपला ‘विकासपुरुष’ फेसबुक पिंट्या काय करत होता?
तो ‘जलपूजन’ करत होता!
शेतकरी जेव्हा शेतातल्या पाण्याकडे पाहून छाती पिटत होता, तेव्हा पिंट्या धरणाच्या भरलेल्या पाण्याकडे पाहून सेल्फी काढत होता. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, आणि पिंट्याच्या चेहऱ्यावर ‘माझ्यामुळेच धरण भरले’ असा विजयाचा आनंद होता.
तेरणा मध्यम प्रकल्प तुडुंब भरल्याची बातमी समजताच पिंट्या आपला लवाजमा घेऊन तिथे पोहोचला. सोबत ‘इव्हेंट मॅनेजर’ ढोकीकर आणि ‘अर्थतज्ञ’ तेरकर तर होतेच, पण आज पिंट्यासोबत खास पूजेचे ताट, साडीचोळी आणि नारळही होता.
पिंट्याने धरणाच्या पाण्याला ‘तेरणा माई’ असे संबोधून, तिची खणा-नारळाने ओटी भरली. ड्रोन कॅमेऱ्याच्या साक्षीने आणि फेसबुक लाईव्हच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. पिंट्याने पाण्याला नमस्कार करत म्हटले, “माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, बघा! मी केलेल्या पाठपुराव्यामुळेच आज तेरणा माई प्रसन्न झाली आहे. मी तिला वचन देतो, की आता धाराशिवमध्ये विकासाची गंगा… सॉरी, विकासाची तेरणा वाहेल!”
हा ‘जल-आनंदोत्सव’ सुरू असतानाच, गर्दीतील एका पत्रकाराने हळूच दुसऱ्याला कोपरखळी मारली. “अरे, आठवतंय का? ज्या दिवशी खोंदला गावातला तो बिचारा शेतकरी वाहून गेला होता, त्याच दिवशी या महाशयांनी धाराशिव शहरात जेसीबीमधून स्वतःवर फुलं उधळून घेतली होती. लाज, लज्जा, शरम… या तिन्ही गोष्टींना बहुतेक त्यांनी याच धरणात जलसमाधी दिली असावी.”
पिंट्याचा हा ‘शो’ सुरू असताना, त्याचा ‘अर्थतज्ञ’ तेरकर बाजूला उभा राहून कॅल्क्युलेटरवर हिशोब लावत होता. “शेतकऱ्यांसाठी समजा १००० कोटींचं पॅकेज आलं, तर त्यातले १०% म्हणजे… व्वा! भाऊ, पूजन एकदम ‘लाभदायक’ ठरलं!”
तर इव्हेंट मॅनेजर ढोकीकर पुढच्या इव्हेंटची तयारी करत होता. तो पिंट्याला म्हणाला, “दादा , पुढच्या वेळी आपण डायरेक्ट धरणाच्या पाण्यात होडीतून ‘कॅबिनेट मीटिंग’ घेऊ. एकदम आंतरराष्ट्रीय बातमी होईल!”
पिंट्याला ही आयडिया प्रचंड आवडली. त्याने लगेच मोबाईल काढला आणि एक विजयी मुद्रेने सेल्फी घेतला. काही क्षणातच फेसबुकवर पोस्ट झळकली:
“तेरणा माईच्या आशीर्वादाने धरण तुडुंब! आज मातेची ओटी भरून जिल्ह्याच्या सुजलाम सुफलाम भविष्यासाठी प्रार्थना केली. विरोधक जळत राहतील, विकासाचे पाणी वाहत राहील! #JalPujan #DamFull #VisionaryPintya #DharashivDevelopment”
आणि या पोस्टवर पहिली कमेंट एका हताश शेतकऱ्याची होती – “साहेब, धरण भरलं… पण आमचं घरदार वाहून गेलंय त्याचं काय?”
…या कमेंटला पिंट्याच्या डिजिटल टीमने क्षणात डिलीट करून त्या युझरला ब्लॉक केले होते.
पुढील भागात भेटूया…
– बोरूबहाद्दर