मागील भागात आपण पाहिले: पिंट्याची ‘ब्लंडर बँक’ आणि आई भवानीच्या कोपामुळे त्याची राजकीय गाडी कशी खड्ड्यात गेली होती, हे आपण पाहिले. आता पाहूया, त्याच्या ‘विकास पुरुष‘ या उपाधीमागचे खरे रहस्य…
फेसबुक पिंट्याच्या चमच्यांनी त्याला ‘विकास पुरुष‘ ही पदवी बहाल केली आहे. त्याच्या फेसबुक पेजवर तर विकासाचा असा काही महापूर आलेला असतो की, धाराशिव जिल्हा मागे पडून सिंगापूर पुढे गेले की काय, असा भास होतो. पण पिंट्याचा विकास म्हणजे नेमकं काय? तर विकासाच्या नावाखाली जमिनी घ्यायच्या, आश्वासनं द्यायची आणि मग स्वतःचा ‘मलिदा’ लाटायचा.
चला, आज आपण पिंट्याच्या ‘विकास यात्रे’वर एक नजर टाकूया. ही यात्रा म्हणजे त्याच्या यशस्वी… ehm… ‘प्रकल्पांची’ सफर आहे.
पाहिले स्टेशन: येडशी रोड – हिऱ्याची खाण ते ज्ञानाची खाण!
सुरुवातीला पिंट्याने येडशी रोडवर ‘हिऱ्याचा कारखाना’ सुरू करण्याची घोषणा केली. बेरोजगारांच्या डोळ्यात हिऱ्यासारखी चमक आली. पिंट्याने जागा घेतली, भूमिपूजन केले, फेसबुकवर फोटो टाकले. पण काही वर्षांनी त्या जागेवर हिऱ्यांऐवजी ‘पिंट्या भाऊ शिक्षण संकुल’ नावाचे कॉलेज उभे राहिले. पिंट्याने लोकांना सांगितले, “हिरे तर दगडाचे असतात, मी तर तुमच्या पोरांना ज्ञानाचे हिरे बनवणार!” (आणि फीच्या रूपात त्यांच्या पालकांकडून खरे हिरे वसूल करणार, हे सांगायचे विसरला.)
दुसरे स्टेशन: गावसुद – मेडिकल कॉलेजचे स्वप्न आणि इंजिनिअरिंगचा ‘हब’
त्यानंतर पिंट्याने तुळजापूर रोडवर मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा केली. गावसुदच्या भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांनी ‘आपल्या पोरांना नोकरी लागेल’ या आशेने नाममात्र दरात जमिनी दान केल्या. पिंट्याने जमिनी ताब्यात घेतल्या आणि… मेडिकल कॉलेज थेट नेरुळला शिफ्ट केले! आणि त्या जमिनीवर एक इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले. आता तर तिथेच शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, त्यामुळे पिंट्या तिथे स्वतःचा ‘लॉजिस्टिक हब’ सुरू करण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात घालून पैसा लाटायचा आणि स्वतःचा ‘हब’ बनवायचा, यालाच पिंट्याच्या भाषेत ‘व्हिजन’ म्हणतात!
तिसरे स्टेशन: शिंगोली – ‘अदृश्य’ साखर कारखाना!
शिंगोलीत साखर कारखाना उभारणार, असे सांगून जमिनी घेतल्या. आज अनेक वर्षे झाली, तिथे फक्त एक उंच चिमणी उभी आहे. ती चिमणी जणू पिंट्याच्या पोकळ आश्वासनांचे स्मारक बनून लोकांना चिडवत आहे. कारखाना कधी सुरू होणार विचारले की पिंट्याचे उत्तर तयार असते, “अहो, तो ‘अदृश्य’ कारखाना आहे. जगातली लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. फक्त विकासाची दृष्टी असलेल्यांनाच दिसतो!”
याव्यतिरिक्त कळंब तालुक्यात दुसऱ्याचा कारखाना हडप करणे, उपळा रोडवर ‘व्हिडीओकॉन’च्या नावाने जागा घेऊन पडून ठेवणे आणि महामार्गात गेल्यावर मलिदा खाणे, हे त्याचे साईड बिझनेस आहेतच.
पिंट्याचा पार्टनरशिप पॅटर्न!
पिंट्याची कार्यपद्धती एकदम हटके आहे. तो इतर नेत्यांसारखा टक्केवारी घेत नाही. तो थेट कंत्राटदारासोबत ‘पार्टनर’ बनतो. तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचेच बघा ना. १६०० कोटींचा गवगवा केला, पण सरकारकडून एक रुपयाही आला नाही. आता भाविकांच्या देणगीतून ५८ कोटींचे जे टेंडर निघाले आहे, त्यात पिंट्याची ‘सायलेंट पार्टनरशिप’ आहे. रस्ता मंजूर करण्यापासून ते मंदिराच्या कामापर्यंत, सगळीकडे पिंट्या ‘पार्टनर’ आहे!
सफरचा शेवट: खरा विकास नेरुळमध्ये!
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, धाराशिवमधून लुटलेला हा सगळा पैसा जातो कुठे? तर या ‘विकास यात्रे’चा शेवटचा आणि खरा स्टॉप आहे – नेरुळ! धाराशिवचा पैसा, धाराशिवच्या जमिनींवर मिळवलेला नफा, सगळं काही पिंट्याने नेरुळमध्ये गुंतवले आहे. त्याचे मोठे उद्योग, मालमत्ता, सगळं नेरुळमध्ये आहे.
त्यामुळे, पिंट्याच्या चमच्यांनो आणि धाराशिवच्या जनतेनो, तुम्हाला जर फेसबुक पिंट्याचा खरा ‘विकास’ बघायचा असेल, तर धाराशिवमध्ये फिरू नका. थेट नेरुळची ट्रेन पकडा. तिथे तुम्हाला पिंट्याच्या विकासाचे खरे ‘मंदिर’ दिसेल, जे तुमच्या आमच्या स्वप्नांच्या पायावर उभे आहे.
आणि या सगळ्यावर कळस म्हणजे, पिंट्याची ताजी फेसबुक पोस्ट – “धाराशिवची माती, माझी आई! इथल्या विकासासाठी माझा प्रत्येक श्वास आहे!” (पोस्ट टाकताना तो नेरुळमधील आपल्या नव्या ऑफिसच्या केबिनमध्ये बसला होता.)
पुढील भागात भेटूया…
-बोरूबहाद्दर