धाराशिव: पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीचा वावर पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. धाराशिव तालुक्यातील आळणी शिवारात चार तोतया पोलिसांनी एका ६२ वर्षीय वृद्धाला पोलीस असल्याचे सांगून फसवणूक करत त्यांच्या हातातील ६० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी अच्युतराव रामभाऊ लावंड (वय ६२, रा. आळणी, ता. जि. धाराशिव) यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अच्युतराव लावंड हे आळणी शिवारातील आपल्या शेत गट नं. २७३ मध्ये जनावरांच्या गोठ्याजवळ थांबले होते.
त्यावेळी तिथे आलेल्या चार अनोळखी इसमांनी आपण पोलीस असल्याचे लावंड यांना भासवले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून आणि तोतयागिरी करून लावंड यांच्या हातातील १२ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (किंमत अंदाजे ६०,००० रुपये) हातचलाखीने काढून घेतल्या आणि पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लावंड यांनी १८ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात चार अनोळखी भामट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या तोतयागिरी करणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे:
-
घटनास्थळ: आळणी शिवार, शेत गट नं २७३.
-
फिर्यादी: अच्युतराव रामभाऊ लावंड (वय ६२).
-
चोरीला गेलेला मुद्देमाल: १२ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (किंमत ६०,००० रु.).
-
आरोपी: ४ अनोळखी तोतया पोलीस.
-
गुन्हा दाखल: धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे (भा.न्या.सं. कलम ३१९(२), ३(५)).







