उमरगा – “आम्ही पोलीस आहोत,” असे खोटे सांगून दोन अनोळखी व्यक्तींनी एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अडवून त्यांचे तब्बल ४ लाख ४३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उमरगा येथे घडली आहे. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी दुपारी गुलबर्गा-उमरगा चौरस्ता रोडवर घडली.
याप्रकरणी शशिकांत रुद्रप्पा चनपटने (वय ६६, रा. कसगी, ता. उमरगा) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशिकांत चनपटने हे दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटांच्या सुमारास गुलबर्गा ते उमरगा चौरस्ता रोडवरून जात होते. प्रज्ञा पेपर कंपनीच्या पुढे सुमारे १०० मीटर अंतरावर असताना, दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. “आम्ही पोलीस आहोत,” असे सांगून त्यांनी चनपटने यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.
“तुमचे सोने आमच्याकडे द्या, पुढे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला ते परत करू,” असे खोटे सांगून आरोपींनी चनपटने यांना त्यांच्या हातातील चार तोळ्याचे सोन्याचे कडे आणि पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी काढण्यास भाग पाडले. चनपटने यांनी दागिने काढून दिल्यानंतर, दोन्ही आरोपी ते दागिने घेऊन त्यांच्या बुलेट मोटारसायकलवर बसून पळून गेले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शशिकांत चनपटने यांनी दुसऱ्या दिवशी, दि. २० ऑक्टोबर रोजी, उमरगा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून, पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९ (२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.