धाराशिव – धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील काकासाहेब खडके या शेतकऱ्याने मुलाच्या गुन्ह्याच्या मनस्तापातून व पोलिसांकडून कथित अपमानास्पद वागणुकीमुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
बार्शी शहरात एका अपंग महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचा (चैन स्नॅचिंग) प्रकार घडला होता. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बार्शी शहर पोलिसांनी धाराशिवच्या धीरज काकासाहेब खडके व आणखी एका युवकावर गुन्हा दाखल केला. फुटेजमधून आरोपींची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी धीरजचा शोध घेण्यासाठी त्याचे वडील काकासाहेब खडके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान काकासाहेब यांचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. तसेच, त्यांना विविध नातेवाईकांकडे घेऊन जात आरोपीचा माग काढण्यात आला. याच दरम्यान, कथित अपमानास्पद वागणूक व शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मानसिक तणावातून काकासाहेब खडके यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या दुर्दैवी घटनेनंतर बार्शी पोलिसांच्या तपासपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून गुन्हा नोंदवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर खडके यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत असून, आरोपींच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.