अणदूरच्या माजी सरपंचाचा भ्रष्ट्राचारी चेहरा एका ऑडिओ क्लिपमुळे समोर आला आणि पुन्हा एकदा सत्तेच्या बड्या हस्तींचे कारनामे उघड झाले. या प्रकरणाने नळदुर्ग आणि अणदूर भागात खळबळ माजली आहे. एका ठेकेदाराने व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपने हा गैरव्यवहार प्रकाशात आणला आहे. ही प्रकरणे काही नवीन नाहीत, परंतु दरवेळी तेच घडूनही लोकांची सहनशीलता आता संपत चालली आहे.
बीडच्या घटनेची पुनरावृत्ती?
हा प्रकार पाहता, काही महिन्यांपूर्वी बीडमध्ये उघडकीस आलेल्या लाचखोरी प्रकरणाची आठवण होते. मोठे राजकीय नेते आणि त्यांच्या हस्तकांनी लोकांच्या हिताची किंमत लाचखोरीच्या बाजारात मांडली आहे. अणदूरमधील हा भ्रष्टाचारही याच धाटणीचा आहे. एका सरकारी प्रकल्पाला अडथळा आणण्यासाठी जबरदस्तीने लाच मागितली जात आहे. यातील आरोपी एका बड्या नेत्याचा ‘राइट हँड’ म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या प्रकरणाला राजकीय संरक्षण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लाचखोरीचे आकडेमोड आणि आकांचा बोका!
अणदूर भागात ४०० केव्ही विजेचे टॉवर्स उभारण्यासाठी एकूण २७ टॉवर्ससाठी जागेची आवश्यकता आहे. एका टॉवरसाठी दोन लाख रुपये अशी एकूण ५४ लाखांची लाच मागण्यात आली आहे. या रकमेचा हिशेब पाहिला, तर यात मोठा घोटाळा असल्याचे स्पष्ट होते. एकीकडे शेतकऱ्यांना मोठमोठ्या रकमा मिळतील असे खोटे आश्वासन दिले जाते, तर दुसरीकडे कंपनीकडून जबरदस्तीने लाच उकळली जाते. अणदूरमधील आका आणि त्याचा बोका मिळून हा संपूर्ण डाव खेळत असल्याचा आरोप लोकांमध्ये होत आहे.
कायदा कुठे आहे?
या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असली, तरी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून लाचखोरांना अद्दल घडवली पाहिजे. कायदा-सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही तर उद्या याहून मोठे गैरव्यवहार उघड होतील. पोलिसांनी निष्पक्ष तपास करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल.
पवनचक्की आणि विजेचे टॉवर्स – एक गोंधळाचे राजकारण
सध्या लोक पवनचक्की प्रकल्पाला विरोध करत असले तरी, विजेच्या टॉवर्सचा विषय वेगळा आहे. हा प्रकल्प शासनाचा असून, तो होणारच. त्यामुळे शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या पुढाऱ्यांच्या भूलथापांना बळी न पडता, कंपनीबरोबर थेट संवाद साधावा आणि योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा, सरकार जमीन संपादन करून हा प्रकल्प पूर्ण करेल, यात शंका नाही.
लाचखोरांचा पर्दाफाश अनिवार्य!
अणदूरमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणाचा केवळ तपासच नव्हे, तर हा भ्रष्टाचार कायमस्वरूपी संपवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. जनतेनेही आता अशा भ्रष्ट लोकांविरोधात आवाज उठवला पाहिजे. भ्रष्टाचारी नेत्यांना आणि त्यांच्या हस्तकांना अंधारात काम करू दिले तर हा समाज कायमचा त्यांच्या विळख्यात अडकलेला राहील. लाचखोरीच्या या नंगानाचाचा पर्दाफाश करूनच अणदूरमधील भ्रष्टाचार संपवला जाऊ शकतो!