धाराशिव: येत्या २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील गणेश स्थापना आणि विसर्जन मार्गावर कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी आज शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली आणि उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे सक्त निर्देश दिले.
या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी हातलाई देवी मंदिर परिसरातील विसर्जन तलाव आणि समता चौकातील सार्वजनिक विहिरीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
“उत्सव काळात भाविकांची गैरसोय नको”
जिल्हाधिकारी पुजार यांनी अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितले की, “गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांना किंवा भाविकांना कोणताही त्रास होता कामा नये. यासाठी आत्तापासूनच नियोजन करा.” त्यांनी गणेश मूर्ती बसवण्यात येणाऱ्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, मिरवणुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण तातडीने हटवणे, आणि आवश्यक ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. तसेच, वीज वितरण विभागाने विद्युत तारांची तपासणी करून दुरुस्ती करावी व गणेश मंडळांनी प्रकाश, पिण्याचे पाणी आणि कचरापेट्यांची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले.
विसर्जन मार्गावर विशेष लक्ष
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश देत जिल्हाधिकारी म्हणाले की, “मिरवणुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवावीत. मिरवणुकीत कोणीही मद्यपान करून सहभागी होणार नाही यावर पोलिसांचे विशेष लक्ष असावे.”
विसर्जन स्थळी चोख बंदोबस्त आणि सुरक्षेचे आदेश
हातलाई देवी तलावावर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच, विसर्जन स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवणे, तलावात जीवनरक्षक तैनात करणे आणि कोणालाही पाण्यात उतरू न देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. निर्माल्य तलावात टाकू नये यासाठी कृत्रिम हौद तयार करून पूजेचे साहित्य त्यातच जमा करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, काळा मारुती चौक ते बार्शी मार्गावरील हातलाई देवी तलावापर्यंतच्या संपूर्ण मार्गाची पाहणी करण्यात आली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.