धाराशिव – धाराशिव शहरात चोरट्यांचा वावर वाढला असून, रविवारी आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील पावणे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केले. तसेच दुसऱ्या एका घटनेत एका दुकानातून मोबाईल चोरीला गेला आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात चोरीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना धाराशिव शहरातील आठवडी बाजारात घडली. स्वाती पृथ्वीराज सस्ते (वय ४८, रा. पद्मिनी निवास, रामनगर, २४ नंबर शाळेजवळ, धाराशिव) या रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी बाजारातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे २,६८,५३४ रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हातचलाखीने चोरून नेले.
दुसरी घटना देशपांडे स्टँड परिसरात घडली. सुवर्णा महेश सानप (वय ३७, रा. देशपांडे स्टँडच्या पाठीमागे, धाराशिव) यांचा सुमारे २०,९९९ रुपये किमतीचा ‘व्हीओ’ (Vivo) कंपनीचा मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. ही घटना दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास देशपांडे स्टँड येथील इरफान शेख यांच्या साऊंडच्या दुकानात घडली.
या दोन्ही प्रकरणी स्वाती सस्ते आणि सुवर्णा सानप यांनी दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.






