येरमाळा – श्री क्षेत्र येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त येरमाळा येथे जमलेल्या गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना १३ एप्रिल रोजी दुपारी घडली असून, याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सरस्वती यशवंत सोनवणे (वय ३९, रा. धोत्रे, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्या १३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येडेश्वरी यात्रेत चुन्याच्या मैदानात पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण आणि ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, असा एकूण ४,०३,१५८ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
घडलेल्या प्रकारानंतर सरस्वती सोनवणे यांनी १५ एप्रिल रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. येरमाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. यात्रेतील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.