धाराशिव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न अखेर मिटला आहे. जलसंपदा विभागाची ३ हेक्टर आणि आयटीआयची ९ हेक्टर ६४ आर जमीन मंजूर करण्यात आली असून, आता लवकरच या ठिकाणी सुसज्ज इमारत आणि हॉस्पिटल बांधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धाराशिव येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दि. २७ जानेवारी २०२१ रोजी मान्यता मिळाली होती. परंतु या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास स्वतंत्र इमारत आणि रुग्णालय नव्हते. ते जिल्हा शासकीय रुग्णलयात सुरु करण्यात आले होते आणि तीन वर्षांकरिता ते भाडेतत्वावर देण्यात आले होते.
अत्याधुनिक वैद्यकीय संकुलाचे उद्दिष्ट : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निर्णय झाल्यापासून जवळपास 3 वर्षांपासून प्रलंबित होता. याबाबत आपण सातत्याने ठाकरे सरकार कडे पाठपुरावा करत होतो, मात्र याबाबत हालचाल होत नव्हती. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासकीय आयटीआय व जलसंपदा विभागाची जागा देण्याबबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता व आज दोन्ही विभागाच्या संमतीनंतर शासन आदेश निर्गमित झाला आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला असून वैद्यकीय संकुल स्थापन करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे, अशी माहिती आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासकीय आयटीआय व जलसंपदा विभागाची जागा देण्यात यावी असा आग्रह आपण धरला होता. हि जागा महामार्गालगत असल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जागेची पाहणी देखील केली होती व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजित दादा पवार साहेब यांनी संभाजीनगर येथील बैठकीत सदर जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्याचा निर्णय घेतला होता व दोन्ही विभागांना याबाबत सहमती देण्यासाठी सूचित केले होते. त्यावर दोन्ही विभागांनी तातडीने याबाबत सहमती दर्शविली असल्याने आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला असून धाराशिव येथे सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय, ४३० खाटांचे रुग्णालय व वैद्यकीय संकुल स्थापनेचा एक टप्पा पार पडला असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.
आता आपले लक्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व रूग्णालयाची सुसज्ज अशी इमारत उभी करणे हे असून यासाठी आवश्यक असणारा निधी व अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्यासाठी आपला शासन दरबारी पाठपुरावा चालूच राहणार आहे.तसेच राज्यातील महायुतीचे सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने वैद्यकीय संकुल देखील लवकरच उभे राहिल याची मला खात्री वाटते असे आ.पाटील यांनी म्हटले आहे.
शासन आदेश पाहा