शिराढोण: शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हासेगाव (शि.) ग्रामपंचायत कार्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अज्ञात व्यक्तीने कार्यालयाच्या मागील खिडकीतून पेटती काठी आत टाकून कपाटातील महत्त्वाची शासकीय कागदपत्रे जाळून खाक केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजण्याच्या दरम्यान घडली. ग्रामपंचायत कार्यालयाला सुट्टी अथवा कार्यालय बंद असताना, एका अज्ञात समाजकंटकाने कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस जाऊन खिडकीतून एक लाकडी काठी आत टाकली. या काठीला कपडा गुंडाळून तो पेटवण्यात आला होता. ही पेटती काठी खिडकीसमोरील उघड्या कपाटावर पडल्याने कपाटातील शासकीय दस्तऐवजांनी पेट घेतला आणि त्यात कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले.
या घटनेनंतर ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र धोडींराम राठोड (वय ३६, रा. नांदुर्गा, ता. औसा, ह. मु. लातूर) यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४(३) तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय दप्तर जाळण्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करत आहेत.






