धाराशिव: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तत्सम पदार्थांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर धाराशिव ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रशांत दगडू सुरवसे (वय ३०, रा. इंगळे गल्ली, येडशी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे २०,३३७ रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.२८ च्या सुमारास येडशी टोलनाका परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येडशी टोलनाक्याजवळ एक व्यक्ती प्रतिबंधित गुटख्याची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धाराशिव ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून प्रशांत सुरवसे याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत राजनिवास पान मसाला, गोवा गुटखा, विमल पान मसाला, बादशाह गुटखा, तंबाखू, डायरेक्टर पान मसाला आणि प्रिमीयम शॉट ९९९ लक्झरी चेविंग तंबाखूचे एकूण १४८ पाऊच आढळून आले.
पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी प्रशांत सुरवसे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम ५९ अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.