उमरगा : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोघांना उमरगा पोलिसांनी आज (शुक्रवार) पहाटे अटक केली. दीपक राजेश्वर दुगनी आणि नरेंद्र रामास्वामी कनकमरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
उमरगा बसस्थानकात पहाटे साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हैदराबादहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एमएच १४ के.क्यू. ६६५० या क्रमांकाच्या बसमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बसची तपासणी केली असता, ‘एम सेंट तंबाखू गोल्ड’ कंपनीचे ८० बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये गुटख्याच्या लहान पुड्या होत्या.
पोलिसांनी ४ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी दीपक दुगनी (रा. हैदराबाद) आणि नरेंद्र कनकमरा (रा. करीमनगर) यांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम ५९ अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.