उमरगा : भूकंप पुनर्वसन जमिनीवर झाडे लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केल्याच्या रागातून एका ४९ वर्षीय दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियमासह (Rights of Persons with Disabilities Act) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेमनाथ मनोहर सूर्यवंशी (वय ४९, रा. मातोळा) यांनी भूकंप पुनर्वसन क्षेत्रातील मोकळ्या जमिनीवर वृक्षारोपण करण्यासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे पत्र दिले होते. ही बाब गावातील काही जणांना खटकली.
याच रागातून आरोपी बंकट प्रेमनाथ भोसले, सुनील व्यंकटराव भोसले आणि दयानंद देविदास भोसले (सर्व रा. मातोळा) यांनी २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नारंगवाडी शिवारातील शेतकरी धाब्यासमोर प्रेमनाथ सूर्यवंशी यांना अडवले. ‘तू जिल्हाधिकाऱ्यांना झाडे लावण्यासाठी पत्र का दिले?’ असा जाब विचारत आरोपींनी सूर्यवंशी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी त्याच दिवशी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम कलम ९२ (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. एका सामाजिक कामासाठी पुढाकार घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.