महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा एक उज्ज्वल आणि तत्त्वनिष्ठ वारसा आहे. ‘संचार’चे आदरणीय रंगाअण्णा वैद्य आणि ‘मराठवाडा’चे आदरणीय अनंतराव भालेराव यांच्यासारख्या महर्षींनी पत्रकारितेचा एकच धर्म शिकवला – तो म्हणजे, निर्भीडपणे सत्तेला प्रश्न विचारणे. पत्रकार हा कायम जनतेच्या बाजूने उभा असलेला एक सजग विरोधी पक्ष असतो, मग सिंहासनावर कोणीही विराजमान असो. गेली ३५ वर्षे पत्रकारितेत काम करताना मी याच एका सिद्धांताचे पालन करत आलो आहे. ‘धाराशिव लाइव्ह’ने नेहमीच सत्तेचा आरसा होण्याचे कर्तव्य बजावले आहे, मग त्या आरशात दिसणारे प्रतिबिंब कितीही विद्रूप असले तरी.
परंतु, आजकाल धाराशिवच्या राजकारणात एक वेगळाच प्रवाह दिसू लागला आहे. जेव्हा आम्ही सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर, धोरणांमधील त्रुटींवर किंवा जनविरोधी निर्णयांवर प्रकाश टाकतो, तेव्हा आमच्यावर थेट ‘विरोधी पक्षाकडून सुपारी घेऊन’ बातम्या लावल्याचा आरोप केला जातो. हा आरोप केवळ हास्यास्पद नाही, तर तो सत्य स्वीकारण्यास असमर्थ ठरलेल्या मानसिकतेचे प्रतीक आहे. आमच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून, सत्ताधारी केवळ स्वतःचा गैरसमज करून घेत नाहीत, तर चुका सुधारण्याची संधीही गमावत आहेत.
सत्तेभोवती नेहमीच हितचिंतकांपेक्षा स्वार्थी कार्यकर्त्यांचा गराडा जास्त असतो. हे ‘कां-फुंकणारे’ कार्यकर्ते स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि राजाच्या जवळ जाण्यासाठी आमच्यासारख्या सत्य मांडणाऱ्यांविरोधात गरळ ओकतात. ते सत्ताधीशांच्या कानात आमच्या विरोधात विष कालवतात आणि राजाला तेच गोड वाटू लागते. पण राज्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावे की, टाळ्या वाजवणारे हात आणि आरसा दाखवणारे हात यात फरक असतो. आम्ही सत्य बातम्या देतो, कारण ते आमचे कर्तव्य आहे आणि समाजाला सत्य कळण्याचा पूर्ण अधिकार आहे.
या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना एकच सांगणे आहे. महाभारतात राजा धृतराष्ट्र जन्माने आंधळा नव्हता, तो पुत्रमोहाने आंधळा झाला होता. दुर्योधन आणि दुःशासनाच्या प्रत्येक चुकीवर पांघरूण घालण्याची त्याची वृत्तीच संपूर्ण साम्राज्याच्या विनाशास कारणीभूत ठरली. आज तुम्हीही तुमच्या भोवती जमलेल्या दुर्योधन आणि दुःशासनाच्या मोहात अडकून ‘धृतराष्ट्र’ बनू नका. कारण हेच लोक तुमची सत्ता घालवतील. तेव्हा तुम्हाला जाग येईल, पण वेळ निघून गेलेली असेल.
‘धाराशिव लाइव्ह’ कुणा व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही, तर चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात आहे. आमचा लढा सत्तेशी नाही, तर सत्तेच्या गैरवापराशी आहे. आमच्यावर कितीही आरोप झाले तरी, आम्ही हा आरसा दाखवण्याचे काम थांबवणार नाही. कारण आम्हाला विश्वास आहे की, लोकशाहीत अंतिम सत्ता जनतेची असते आणि जनतेसमोर सत्य मांडणे हेच पत्रकाराचे अंतिम कर्तव्य आहे.
- सुनील ढेपे, संपादक