कळंब – चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच आपल्या पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, कोयत्याने आणि काठीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथील पारधी वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी पतीविरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बुगाबाई युवराज पवार (वय ३० वर्षे, रा. पारधी वस्ती, शेळका धानोरा) यांना त्यांचे पती आरोपी युवराज अच्युत पवार यांनी बुधवारी, दि. ०८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. यावरून आरोपीने बुगाबाई यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने घरातील कोयता आणि काठीने त्यांना अमानुष मारहाण करून गंभीर जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यानंतर पीडित महिला बुगाबाई पवार यांनी गुरुवारी, दि. ०९ ऑक्टोबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी पती युवराज अच्युत पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.