वाशी – भुम-पार्डी रस्त्यावर कत्तलीसाठी गोवंशियांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला वाशी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. नयुम आयुब सौदागर (वय ४६, रा. मोमीन गल्ली, भुम, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून चार जर्शी गायी आणि दोन वासरे जप्त करण्यात आली आहेत. ही घटना शुक्रवार, दिनांक ९ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पार्डी शिवारातील नदीच्या पुलावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नयुम सौदागर हा पिकअप वाहन (क्र. एमएच ०३ सीव्ही ७३०२) मधून ४५,००० रुपये किमतीच्या चार जर्शी गायी आणि दोन गोवंशीय वासरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अत्यंत निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात होता. वाशी पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ४,४५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये गोवंशियांसह वाहनाचाही समावेश आहे.
आरोपी नयुम सौदागर याच्याविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(ब), ९, ११ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१), ११(१)(ए), ११(१)(एच), ११(१)(एफ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात अवैध गोवंश वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.