धाराशिव – शहरातील तुळजापूर रोड परिसरात एका किराणा दुकानातून पोलिसांनी तब्बल १ लाख ४ हजार ४१४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. अवैधपणे विक्रीसाठी हा साठा बाळगणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान उर्फ जाकीर तांबोळी (रा. समता कॉलनी, धाराशिव) आणि दत्तात्रय पांडुरंग कामठेकर (रा. समता नगर, धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत. १२ जुलै रोजी दुपारी २ वाजून २० मिनिटांच्या सुमारास श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘महाराष्ट्र किराणा दुकान’ येथे हे दोघे राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, विक्रीसाठी ठेवलेला एकूण १,०४,४१४ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तो तात्काळ जप्त केला.
या प्रकरणी, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमाच्या कलम ५९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.