धाराशिव: शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर धाराशिव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. फयाज फरीद शेख (वय ३२, रा. दर्गा रोड, इस्लामपूरा, धाराशिव) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एकूण ७१,५०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वडगाव सि ते वरवंटी रोडवर ही कारवाई करण्यात आली. आरोपी फयाज शेख हा त्याच्या मोटरसायकल (क्र. एमएच २५ बीडी ४५६५) वरून राजनिवास पान मसाला आणि सुगंधी सुपारी यांसारख्या प्रतिबंधित गुटखा पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत होता.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल असा एकूण ७१,५०२ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी, आरोपी फयाज शेख विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात अवैध गुटखा विक्रीचे रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.