धाराशिव – तालुक्यातील महाळंगी पाझर तलाव क्र. २ मधील बेकायदेशीर मुरूम उपसा प्रकरणात मोठा वाद उफाळून आला आहे. आज दि. २६ मार्च २०२५ रोजी सकाळी तक्रारदार पाशाभाई शेख यांना तहसील कार्यालयातून फोन आला. “तहसीलदार मॅडम आज ११ वाजता मुरूम चोरीच्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा करतील, तुम्ही उपस्थित राहा,” अशी सूचना देण्यात आली होती.
पंचनामा करण्याआधीच तक्रारदारावर हल्ला
तहसीलदारांच्या सूचना मिळाल्यानंतर पाशाभाई शेख सकाळी ११ वाजता महाळंगी गावात पोहोचले. मात्र, तिथे पोहोचताच काही स्थानिकांनी त्यांच्या वर जोरदार हल्ला केला आणि पंचनामा करण्यास विरोध केला. विशेष म्हणजे, हल्ल्याच्या आधीच तलाठी मुंडे हे हल्लेखोरांसोबत होते. तलाठी मुंडे हे त्या हल्लेखोरांसोबत का होते? यावरून प्रशासनाच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे.
तहसीलदारांची माघार: आदेश की दबाव?
हल्ला सुरू असतानाच तहसीलदार मॅडम गावाच्या वेशीवर पोहोचल्या मात्र परिस्थिती पाहून परत गेल्या. तहसीलदार मॅडम कोणाच्या आदेशावरून परत गेल्या? किंवा कोणाला घाबरून त्यांनी माघार घेतली? हा प्रश्न नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळवत आहे.
हल्लेखोरांसोबतच पंचनामा: सत्य दडपण्याचा प्रयत्न?
हल्ल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी गोंधळ घालणाऱ्या लोकांसोबतच मिळून पंचनामा केला. या पंचनाम्यावरील तक्रारदारांचा कडक आक्षेप आहे. प्रशासनाने हल्लेखोरांशी हातमिळवणी करत खोटा पंचनामा केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
हल्ला झाल्यानंतर तक्रारदारांनी तात्काळ बेंबळी पोलीस ठाण्याला फोन करून पोलिसांना बोलावले. मात्र, पोलीस घटनास्थळी आल्यानंतरही हल्लेखोरांशी सौम्यपणे वागत होते. हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये पूर्वीचे संबंध असल्याचा संशय निर्माण झाला आहे. गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी अटक का केली नाही? हल्लेखोरांना पूर्णपणे मोकळीक दिल्याने पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत.
व्हिडिओ चित्रीकरणाला बंदी: कायद्याचा दुरुपयोग?
मुरूम चोरीच्या ठिकाणी तक्रारदार व्हिडिओ काढत असताना मंडळाधिकारी यांनी व्हिडिओ काढू नका असे सांगितले. “मी पंचनामा करणार नाही” अशी धमकी देऊन व्हिडिओ चित्रीकरण थांबविण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक ठिकाणी चोरी झालेल्या घटनेचा व्हिडिओ काढणे गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
हल्लेखोरांना पाठराखण: पोलीस आणि महसूल विभागाचे संगनमत?
पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी तक्रारदारासह हल्लेखोरांपैकी फक्त एका व्यक्तीला पोलीस स्टेशनला नेले. मात्र, तक्रारदारावरच गुन्हा नोंदवला गेला, तर हल्ला करणाऱ्यांपैकी फक्त एकावरच कारवाई झाली. हा न्याय आहे का? पोलिसांनी पैशाच्या प्रभावाखाली काम केले का?
सरकारी मालमत्तेचे नुकसान: तलाठ्याचे दुर्लक्ष
हल्लेखोरांनी तलाठी कार्यालयाच्या खिडक्या फोडल्या. तरीही तलाठी . मुंडे यांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल का केली नाही? सरकारी मालमत्तेचे नुकसान होत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले?
धाराशिव तालुक्यातील या बेकायदेशीर मुरूम उपसा प्रकरणात प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष आणि राजकीय वरदहस्त असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हल्लेखोरांना पोलिस आणि महसूल विभागाचा पाठिंबा मिळत असल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनतेचा रोष वाढून आंदोलनाच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे.