तामलवाडी: तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे तलवार बाळगणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. शेताच्या बांधावर गवताखाली लपवून ठेवलेली तलवार तामलवाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर रज्जाक मुल्ला (वय २०, रा. तामलवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. २१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास तामलवाडी शिवारात इम्रान बेगडे व हिना शेख यांच्या शेताच्या सामाईक बांधावर ही कारवाई करण्यात आली.
आरोपी समीर याने जिल्हादंडाधिकारी यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत, लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत एक तलवार गवताखाली लपवून ठेवली होती. तामलवाडी पोलिसांच्या पथकाला ही तलवार मिळून आल्यानंतर ती जप्त करण्यात आली.
पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उमेश सुरेश माने यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी समीर मुल्ला याच्याविरुद्ध शस्त्र कायदा कलम ४, २५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.






