धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे २१ नोव्हेंबर रोजी एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून करून दागिने लुटल्याची घटना घडली होती. या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले असून, ४० हजार रुपयांच्या वादातून शेजारील महिलेनेच हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी संबंधित महिला आरोपीला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळकोट येथे सुभद्रा रामशेट्टी पाटील (वय ६० वर्षे) या वृद्ध महिलेचा त्यांच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने खून केला होता. तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही चोरून नेले होते. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३११ (८), ३०५ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून मिळाली दिशा
गुन्हा घडल्यानंतर पोलिसांकडे कोणताही प्रत्यक्ष पुरावा नव्हता. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान एक संशयित महिला घटनास्थळाच्या आसपास फिरताना आढळून आली. अधिक माहिती घेतली असता ती त्याच परिसरातील वनिता झुंबर सुरवसे असल्याचे समजले.
आरोपीचा पुण्यातून शोध
पोलिसांनी वनिता सुरवसे हिच्या घरी चौकशी केली असता, ती उपचारासाठी ससून रुग्णालय, पुणे येथे गेल्याचे तिच्या मुलाने सांगितले. मात्र, पोलिसांच्या पथकाने पुण्यात जाऊन शोध घेतला असता, ती भिगवण येथे तिच्या मुलीकडे असल्याचे समजले. पोलिसांनी तिला भिगवण येथून ताब्यात घेतले.सुरुवातीला आरोपी महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी वनिता सुरवसे हिने मयत सुभद्रा पाटील यांच्याकडून दागिने गहाण ठेवून ४० हजार रुपये उसने घेतले होते. या पैशांवरून मयत महिला आरोपीला सतत तगादा लावत होती आणि त्रास देत होती. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सुभद्रा पाटील यांचा खून केला आणि दागिने घेऊन पलायन केलं.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, तसेच अंमलदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, प्रकाश औताडे, सुभाष चौरे, रत्नदिप डोंगरे आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली. आरोपी महिलेला पुढील तपासासाठी नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.






