तुळजापूर: श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभारा विकासाच्या मुद्द्यावरून तुळजापुरात राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तुळजापूर दौऱ्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या निदर्शनांनंतर, महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आव्हाडांसमोर झालेला गोंधळ हे आमदार राणा पाटील यांनीच घडवून आणलेले कटकारस्थान असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
रविवारी, आमदार जितेंद्र आव्हाड श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले असता, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. मंदिराचा गाभारा आणि शिखर पाडण्याविषयी आव्हाड यांनी विधान केल्याचा आरोप करत ही निदर्शने करण्यात आली. या घटनेनंतर तुळजापुरातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला.
महाविकास आघाडीचा पलटवार
या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर जो राडा घालण्यात आला, तो आमदार राणा पाटील यांच्याच सांगण्यावरून झाला आहे. यापुढे महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यासोबत असा प्रकार घडल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ, आम्ही कमी पडणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
याच पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते ऋषिकेश मगर यांनी, “आमच्या वाडवडिलांनी अनेक संकटांतून हे मंदिर जपले आहे. केवळ सहा वर्षांपूर्वी आमदार झालेल्या राणा पाटलांनी आम्हाला मंदिराविषयी शिकवू नये,” अशा शब्दांत सुनावले. तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी या प्रकाराला ‘गुंडगिरी’ संबोधून, “आम्ही देखील आमदार पाटलांना ग्रामीण भागात अडवून जाब विचारू शकतो, त्यांनी इतर पक्षांना कमी लेखू नये,” असे आव्हान दिले.
भाजप समर्थकांचे आव्हाडांना प्रश्न
दुसरीकडे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. “मंदिर पाडले जाणार आहे, याचा कोणता पुरावा आव्हाड यांच्याकडे आहे? त्यांनी कोणताही आधार नसताना चुकीची माहिती पसरवून तुळजापूरची बदनामी करू नये,” असे रोचकरी म्हणाले. प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांनीही आव्हाडांची भूमिका चुकीची असून त्यांनी शहरात तणाव निर्माण केल्याचा आरोप केला.
अफवा आणि प्रशासनाची भूमिका
श्री तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर काढण्यावरून शहरात उलटसुलट चर्चा आणि अफवांचे पीक आले आहे. याच गदारोळात, मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती पुजारी यांनी स्पष्ट केले आहे की, “राज्य पुरातत्त्व खात्याकडून गाभारा काढण्याविषयी अद्याप कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही.” प्रशासनाच्या या स्पष्टीकरणामुळे राजकीय नेते ठोस माहितीशिवाय आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एकंदरीत, १८६५ कोटींच्या विकास निधीवरून सुरू झालेले राजकारण आता मंदिराच्या संवेदनशील मुद्द्यापर्यंत पोहोचले आहे. सर्वपक्षीय सहमती आणि प्रशासनाकडून अधिकृत माहितीचा अभाव यामुळे गैरसमज वाढत असून, या पवित्र तीर्थक्षेत्रातील वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता यावर प्रशासन कोणती अधिकृत भूमिका जाहीर करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.