गेली ३५ वर्षे… एक तपाहून अधिक काळ! जेव्हापासून हातात लेखणी धरली, तेव्हापासून ती कधीच कुणासमोर झुकली नाही. ‘लोकमत’, ‘एकमत’, ‘लोकसत्ता’पासून ते ‘भास्कर’ आणि ‘देवगिरी तरुण भारत’पर्यंत… महाराष्ट्रातील तमाम प्रतिष्ठित वृत्तपत्रांच्या पानांवर ज्यांची शाई उमटली, टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून ज्यांचा आवाज घुमला, त्या सुनील ढेपे नावाच्या एका पत्रकाराची ही नुसती कहाणी नाही, तर ही एक ‘अग्निपरीक्षा’ आहे.
गेल्या १४ वर्षांपासून ‘धाराशिव लाइव्ह’च्या माध्यमातून मी स्वतःचे अस्तित्व जपले. निर्भीडता, निष्पक्षता आणि सडेतोड बाणा हाच माझा श्वास आणि हाच माझा ध्यास होता. पण जेव्हा हाच सडेतोडपणा तुळजापूरसारख्या पवित्र भूमीत चाललेल्या अपवित्र धंद्यांवर प्रहार करू लागला, तेव्हा सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्यांची खुर्ची डळमळली.
पाप उघडे पडले आणि सुडाचे राजकारण सुरू झाले…
तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण असो, फोफावलेले अवैध धंदे असो किंवा बस स्थानकाच्या कामात झालेला ८ कोटींचा अवाढव्य भ्रष्टाचार… जेव्हा मी या प्रकरणांची लक्तरे वेशीवर टांगली, तेव्हा एका सत्ताधारी नेत्याच्या पायाखालची वाळू सरकली. सत्य पचवता आले नाही, म्हणून मग सुरू झाला माझा आवाज दाबण्याचा अघोरी प्रयत्न.
सुरुवात झाली सोशल मीडियाच्या घाणेरड्या ट्रोलिंगने. पण जेव्हा हा आवाज सोशल मीडियाच्या कोलाहलातही दबेना, तेव्हा सत्तेचा नंगानाच सुरू झाला. १५० गाड्यांचा ताफा, ५०० जणांचा जमाव… जणू एखाद्या दहशतवाद्याला पकडायचे आहे, अशा थाटात पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली गेली. मागणी काय? तर, “माझ्यावर गुन्हा दाखल करा.” एका पत्रकाराचा आवाज बंद करण्यासाठी इतका आटापिटा?
गुंडांची मदत आणि खाकीवर दबाव
जेव्हा या जमावबंदीच्या नाटकानेही माझे मनोधैर्य खचले नाही, तेव्हा या नेत्याने नीचतेची पातळी गाठली. ज्याच्यावर १७ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा एका गुंडाला हाताशी धरले. पोलिसांवर राजकीय दबाव आणला आणि माझ्यावर एक नव्हे, तर तब्बल तीन खोटे गुन्हे दाखल केले. हे कमी म्हणून की काय, माझा जामीन होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणेचा जेवढा गैरवापर करता येईल, तेवढा केला गेला.
दुर्दैव ‘विकल्या’ गेलेल्या लेखणीचे…
सर्वात जास्त वेदना पोलिसांच्या कारवाईची नाही, तर माझ्याच क्षेत्रातील काही ‘भुरट्या’ पत्रकारांची झाली. ज्यांची लेखणी पाकिटाच्या वजनाखाली वाकलेली असते, ज्यांना ‘पेड न्यूज’ छापल्याशिवाय दिवस उगवत नाही, अशांनी मला ‘तथाकथित पत्रकार’ म्हणून हिणवले. ज्यांनी आयुष्यभर फक्त दलाली केली, त्यांनी ३५ वर्षांची तपश्चर्या असलेल्या पत्रकारावर चिखलफेक करावी, हा काळाचा केवढा मोठा विनोद!
माझा खंडेराया आणि विठुराया साक्षीला आहेत!
तुम्ही जमाव जमवाल, गुन्हे दाखल कराल, चार पैसे देऊन बातम्या छापून आणाल… पण सुनील ढेपेचा कणा तुम्ही मोडू शकणार नाही. कारण माझ्या संघर्षात एकटेपणा नाहीच. माझ्या पाठीशी माझा अणदूर – नळदुर्गचा खंडेराया आहे, पंढरीचा विठुराया आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या जनतेसाठी मी लढलो, त्या जनतेचे अलोट प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेत.
सत्तेच्या नशेत असलेल्यांना माझं हेच सांगणं आहे –
तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही दबाव आणा… हा आवाज जनतेचा आहे, अन्यायाविरुद्धचा आहे. तो दाबला जाईल, पण कधीही संपणार नाही.
ही लढाई आता फक्त माझी राहिलेली नाही, ती प्रत्येक स्वाभिमानी पत्रकाराची आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाची आहे.
लढणार… आणि जिंकणारच!
– सुनील ढेपे
संपादक, धाराशिव लाइव्ह






