संभाजीनगर/धाराशिव: राजकारणात भूकंप होणं काही नवीन नाही, पण नुसत्या एका बातमीने दोन जिल्हे हादरून जावेत आणि सोशल मीडियावर विनोदाचे फवारे उडावेत, असं क्वचितच घडतं. आज नेमकं तेच घडलं! झालं असं की, “कैलास पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश” ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि धाराशिवच्या लोकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
“आपला वाघ… कट्टर शिवसैनिक… गुवाहाटीतून परत आलेला मर्द… तो कसा काय जाऊ शकतो?” अशा चर्चा धाराशिवच्या कट्ट्याकट्ट्यावर आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर सुरू झाल्या. अनेकांनी तर आमदार कैलास पाटलांना थेट फोन लावायची तयारी केली. पण म्हणतात ना, “दिखता है, पर होता नही,” तसाच काहीसा हा प्रकार होता.
आता वाचा खरी गंमत!
ज्या कैलास पाटलांनी शिंदे गटात प्रवेश केला, ते आहेत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर-खुलाताबाद मतदारसंघाचे माजी आमदार. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात होते. त्यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. पण नावाच्या साधर्म्यामुळे मीडियाने बातमी चालवली, “कैलास पाटील शिंदे गटात!” आणि इकडे सगळा गोंधळ उडाला.
‘ते’ पाटील नव्हे, ‘हे’ पाटील!
धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे कट्टर ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जातात. ज्यावेळी एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले होते, तेव्हा हाच वाघ अर्ध्या रस्त्यातून गाडीतून उतरून उद्धव ठाकरेंकडे परत आला होता. याच शौर्यामुळे स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांना “शिवसेनेचा वाघ” म्हणून गौरवले होते. २०१९ आणि २०२४ च्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. त्यांची ओळखच “ठाकरेंचा कट्टर समर्थक” अशी आहे.
सोशल मीडियावर विनोदाचा पाऊस!
जेव्हा खरा प्रकार लोकांना कळला, तेव्हा धाराशिवच्या जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला. पण या गोंधळाची मजा घ्यायला अनेकांनी हीच बातमी मुद्दाम शेअर करायला सुरुवात केली. त्यावर पडणाऱ्या कमेंट्स तर वाचून हसून हसून पोट दुखेल.
- एकाने लिहिले, “अरे घाबरलो की राव, वाटलं वाघाने कळप बदलला.”
- तर दुसरा म्हणतो, “संभाजीनगर वाल्यांनी आमचा BP वाढवला होता.”
- एका पठ्ठ्याने तर थेट प्रतिक्रिया दिली, “नावात काय आहे म्हणतात, पण आज कळलं नावातच ‘राजकीय भूकंप’ आहे!”
थोडक्यात काय, तर संभाजीनगरमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाने धाराशिवमध्ये मात्र चांगलाच ‘विनोदी भूकंप’ घडवून आणला आहे.